

राहुल हातोले
पिंपरी : चिंचवड लक्ष्मीनगर येथील पाच वर्षापूर्वी सुरू केलेल्या स्व. मुरलीधर गावडे उद्यानात वेगवेगळ्या जातीची आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील जैवविविधता उद्यान अशी ओळख असल्याने या उद्यानाला ऑक्सिजन पार्क म्हणून देखील ओळखले जाते. मात्र, उद्यानातील साधनांची दूरवस्था झाली आहे.
उद्यानात जागोजागी वाळलेले गवत दिसून येते. नागरिकांना चालण्यासाठी केलेल्या ट्रॅकवर गवत आणि माती पसरलेली आहे, योगासने आणि व्यायामासाठी केलेल्या ओट्याची दूरवस्था झाली आहे. तसेच सुरक्षारक्षकाअभावि येथील सिएसआर फंडामधून उभारलेल्या प्रकल्पातील मोटर चोरीला गेली आहे. लाखमोलाची झाडे, सांडपाणी प्रक्रिया सयंत्र तसेच आदी उद्यान विभागाची मालमत्ता राम भरोसे असलेली पुढारी प्रतिनिधीला दिसून आली आहे.
या उद्यानाचे देखभालीचे काम तृतीय पंथीयांकडे देण्यात आले आहे. दुपारी बारा ते चार आणि रात्री दहा वाजेनंतर उद्यान बंद असल्याची सूचना मुख्य गेटवर लावली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ही लोक उद्यानामध्ये असतात. मात्र, त्यानंतर सुरक्षा रक्षकाअभावि उद्यानाचे दरवाजे चोवीस तास सताड उघडे असतात. उद्यानात लाख मोलाचे लाखंडी साहित्य तसेच सांडपाणी प्रक्रिया संयत्र आहे. याची चोरी होण्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.