उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत ‘इतक्या’ हरकती दाखल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षणांबाबत 15 हरकती निवडणूक विभागाकडे दाखल झाल्या असून, त्यात सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 35 या एकाच प्रभागाच्या आरक्षणाविषयी 10 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या प्रभागासाठी 31 मे रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसारच आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या निर्देशांनुसार, मनपाने 23 मे रोजी आरक्षण सोडत काढली होती. त्यानंतर मागील महिन्यात 29 जुलैला ओबीसी आरक्षण कायम करण्याचा निर्णय दिल्याने ओबीसी प्रवर्गाच्या 35 जागांसाठी सोडत काढण्यात आली. 133 पैकी अनुसूचित जाती आणि जमातीच्या 29 जागांचे आरक्षण कायम ठेवत 104 सर्वसाधारण जागांमधून ओबीसी प्रवर्गासाठी 35 जागांवर आरक्षण टाकण्यात आले. त्यामुळे सर्वसाधारण गटातील जागांची संख्या घटल्याने सर्वसाधारण महिला राखीव जागेतही बदल करावा लागल्याने सर्वसाधारण महिला राखीव 34 जागांसाठीदेखील आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यात सहाही विभागांतून 15 हरकती प्राप्त झाल्या.

जुन्या नाशिकमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये 31 मे रोजीच्या सोडतीत अनुक्रमे अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण खुला व क – सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले होते. 29 जुलैच्या फेरआरक्षण सोडतीत मात्र अ जागेसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, ब जागेकरिता सर्वसाधारण महिला आणि क साठी सर्वसाधारण असे आरक्षण पडले. हे अन्यायकारक असल्याची हरकत नंदन भास्करे यांनी घेतली आहे. 31 मे रोजीच्या आरक्षण सोडतीनुसारच आरक्षण ठेवण्याची मागणी भास्करे यांनी केली आहे. प्रभाग 35 बाबत सूरज येलमामे, प्रदीप गोफणे, मंगेश मोरे, गौतम पराडे, प्रफुल्ल व्यवहारे आदी 10 जणांनी स्वतंत्रपणे हरकती नोंदवत 31 मे रोजीच्या आरक्षण सोडतीनुसारच सर्वसाधारण जागा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

5 ऑगस्टला अधिसूचना
प्राप्त झालेल्या हरकतींची छाननी निवडणूक विभागामार्फत करण्यात येणार असून, त्यात तथ्य आढळून आल्यास दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर दि. 5 ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय अंतिम आरक्षणाची अधिसूचना आयुक्तांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT