उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा, अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे उद्घाटन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
800 वर्षांपूर्वी अटेकपार झेंडा रोवणार्‍या मराठी भाषेला संकुचित विचारसरणीने जखडले आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठी महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली असून, तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वदूर जागर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प. पू. बिडकर बाबा यांनी केले. श्री चक्रधरस्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभावपंथाच्या प्रचार-प्रसारासाठी पुढच्या पिढीला संस्कारक्षम केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डोंगरे वसतिगृह मैदान येथील चक्रधरनगरीत भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचा सोमवारी (दि.29) उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी बिडकर बाबा बोलत होते. याप्रसंगी जामोदेकर बाबा, सुकेणेकर बाबा, भोजने बाबा, आश्वाख्य बाबा, साळकर बाबा, पुंजदेकर बाबा, रुक्मिणी पंजाबी, आयोजक माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, प्रकाश घुगे, प्रकाश नन्नावरे आदी उपस्थित होते.

बिडकर बाबा म्हणाले की, संत ज्ञानेश्वर यांनी 'आता विश्वात्मके देवे'मधून विश्वाचा संदेश दिला असताना मराठी ही केवळ महाराष्ट्रापुरतीच उरली आहे. चक्रधरस्वामींनी 800 वर्षांपूर्वी स्थापन केलेला महानुभावपंथाचा प्रचार-प्रसार हा त्यावेळी काबुल-कंदहारपर्यंत होता. पण, आज हा पंथ महाराष्ट्रापुरता मर्यादित असून, जगभरात केवळ अमेरिका व नेपाळ येथे मंदिर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साळकर बाबा यांनी चक्रधरस्वामी यांचे विचार पोहोचविण्यासाठी विविध भाषांमधील नवीन लेखक तयार झाले पाहिजे. महानुभाव पंथातील हजारो ग्रंथ हे मराठीसह तत्सम भाषेत लिखाण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. पुंजदेकर बाबा यांनी मानवतेचा खरा संदेश चक्रधरस्वामींनी दिल्याचे सांगितले.

नाशिककरांचा स्तुत्य उपक्रम : बिडकर बाबा
ज्ञानापेक्षा अनुभूती महत्त्वाची असल्याचे सांगताना श्री चक्रधरस्वामी यांच्या झाडतळी व गंगातळी हा उद्देश पुनरुज्जीवित करून सीमेपार महानुभावपंथ वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे बिडकर बाबा यांनी सांगितलेे. नाशिकमधील महानुभावपंथीय व आयोजकांनी संमेलनाच्या माध्यमातून हे कार्य पुन्हा उभे करण्याचा केलेला उपक्रम स्तुत्य असून, उत्तर भारतामध्ये त्याचे अनुकरण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री चक्रधरस्वामी जन्मोत्सव उत्साहात
चक्रधरनगरी येथे सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदनाने संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. तद्नंतर भगवान श्री चक्रधरस्वामी यांचा जन्मोत्सव व पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारच्या सत्रात कविसंमेलन व प्राचीन काव्यवाचन कार्यक्रम पार पडला. सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संमेलनास उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. संमेलनस्थळी पेठ-सुरगाणा पट्ट्यातून आलेले 500 हून अधिक स्वयंसेवक सेवा देत आहेत. शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड, सातपूर, इंदिरानगर या उपनगरांमधील भाविकांनीही मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

हेही वाचा  :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT