नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
शहरासह परिसरात होणार्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणावर हवेत प्रदूषण निर्माण होते. हवेत धूलिकण पसरत असल्याने नागरिकांना श्वसनासारख्या विकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बांधकाम सुरू असताना त्याच्या अवतीभोवती ग्रीननेट लावण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले होते. मात्र, या आदेशाला महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आता नगर रचना विभागालाच त्याचे वावडे, तर मग बिल्डरांना ग्रीननेट कशी आवडेल, अशी स्थिती आहे.
शहरात सुरू असलेल्या भरमसाट बांधकामांच्या एकाही ठिकाणी ग्रीननेट लावलेली दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे मनपा नगर रचना विभागाच्या अधिकार्यांना वावडे आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाने मागील वर्षी यासंदर्भातील आदेश मनपाला देऊन त्याचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली होती. मात्र, नगर रचना विभागाकडून केवळ देवाण घेवाणीच्याच प्रकरणांकडे लक्ष असल्याने राज्य शासन आणि आयुक्तांनी दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष होत आहे. नगर रचना विभागाचे प्रत्येक विभागात कनिष्ठ, सहायक आणि उपअभियंता असतात. त्यामुळे या अभियंत्यांकडून खरे तर बांधकामांच्या ठिकाणी ग्रीननेट बसविण्यात आले आहे की नाही, यावर लक्ष ठेवले जाऊ शकते. परंतु, बहुतांश सर्वच अभियंते आपापल्या कामात व्यग्र असल्याने कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांचेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही.
नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये, यादृष्टीने ग्रीननेट लावण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. बांधकामाच्या ठिकाणी माती, सिमेंट, वीट तसेच रंगकाम याद्वारे मोठ्या प्रमाणावर धूलिकण बाहेर पडत असतात. या धुलिकणांमुळे नागरिकांना डोळ्याला तसेच श्वसन मार्गाला इजा पोहोचू शकते. त्या दृष्टीने खबरदारी म्हणून शासनाने ग्रीननेट लावण्याचे बंधनकारक केलेले आहे. असे असताना आज शहरात एकाही बांधकामाच्या ठिकाणी या नियमाचे पालन केले जात नसल्याने त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अधिकार्यांचा कानाडोळा
महापालिकेसमोरच अनेक बांधकामे सुरू आहेत. दररोज ये-जा होणार्या रस्त्यांवरील बांधकामे अधिकार्यांना दिसत नसेल वा त्याकडे कानाडोळा केला जात असेल तर शहरातील इतर ठिकाणच्या बांधकामांचे तर विचारायलाच नको!
आयुक्त करणार सूचना
यासंदर्भात कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मनपा आयुक्त रमेश पवार यांना ग्रीननेटसंदर्भात विचारले असता या प्रकरणी नगर रचना विभागाकडून माहिती घेऊन शासन नियमांचे तत्काळ पालन करण्यास सांगितले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.