सातारा : शिवसेनेत अस्वस्थता, तर भाजपमध्ये उकळ्या | पुढारी

सातारा : शिवसेनेत अस्वस्थता, तर भाजपमध्ये उकळ्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे नेते ना. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अनेक आमदारांसह बंडाचे निशान फडकवल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघेही नॉट रिचेबल असल्यामुळे जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेच्या गोटात कमालीचा सन्नाटा दिसत असताना भाजपच्या गोटात मात्र उकळ्या फुटत होत्या. सातार्‍याच्या राजकीय पटलावर राज्याच्या राजकारणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत.

सातारा जिल्हा राजकीयद़ृष्ट्या नेहमीच संवेदनशील राहिला आहे. मंगळवारची सकाळही सातार्‍यासाठी खळबळजनक घडामोडी समोर आणणारी ठरली. मुळचे सातारा जिल्ह्यातील मात्र राज्याच्या राजकारणात शिवसेनेमध्ये दबदबा निर्माण केलेले एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होवून त्यांनी समर्थक आमदारांसह गुजरात गाठल्याची बातमी सातारा जिल्ह्यात धडकल्यानंतर राजकीय पटलावर हलकल्लोळ उडाला. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सातार्‍यातील पाटणचे आमदार व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेल्याच्या बातम्या वृत्तवाहिनीवर झळकल्यानंतर त्याची चर्चा जिल्ह्यात वार्‍याच्या वेगाने पसरली. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण पुरते ढवळून गेले. विशेषत: शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली.

सकाळपासून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मौनव्रत बाळगले. दुपारपर्यंत कुणीही पदाधिकारी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. राज्याच्या घडामोडींकडे सारेजण लक्ष ठेवून होते. असे का घडले? एवढे काय झाले? सरकार कोसळण्याइतपत परिस्थिती का निर्माण झाली? याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. सातार्‍यात गटागटाने पदाधिकारी, कार्यकर्ते चर्चा करताना दिसून येत होते. शिवसेनेच्या गोटात कमालीचा सन्नाटा दिसत असताना भाजपच्या गोटात मात्र उकळ्या फुटत होत्या. भाजप पदाधिकारी आता आपलेच सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे छातीठोकपणे सांगू लागले होते.

Back to top button