उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा : दायित्व कमी करण्यासाठी अधिकार्‍यांकडूनच चालढकल, आयुक्तांनी दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेवर असलेले उत्तरदायित्व पाहता, अनावश्यक कामांना कात्री लावण्याबाबत मनपा आयुक्त रमेश पवार यांनी आदेश देऊनही त्याकडे संबंधित विभागांचे अधिकारीच कानाडोळा करीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता अशा चालढकल करणार्‍या अधिकार्‍यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देत संगणकीय अंदाजपत्रक प्रणालीत अनावश्यक कामे रद्द करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

मनपाचे दायित्व सुमारे 2,823 कोटी इतके आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अखेरचे वर्ष असल्याने विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला. त्यात 800 कोटींचे भूसंपादन, 250 कोटींचे उड्डाणपूल, सुमारे 700 कोटींचे रस्ते तसेच अन्य कामांवरही मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याने दायित्वाचा डोंगर वाढला आहे. एकूण उत्पन्नाच्या दीडपट खर्चाची मर्यादा असताना, त्यापेक्षा अधिक खर्च झाल्याचे समोर आल्याने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सर्वच खातेप्रमुखांना अनावश्यक कामांची यादी सादर करून प्राधान्यक्रमानेच कामे करण्याचे आदेश दिले होते. सुमारे 200 कोटींची कामे अनावश्यक असल्याचे आढळून आल्याने ही कामे रद्द होणे आवश्यक होते. तसेच मायको सर्कल उड्डाणपूल व अन्य काही कामे रद्द करून जवळपास 500 कोटींचा भार कमी करण्याचे नियोजन होते. मात्र अधिकार्‍यांकडून तसे प्रयत्नच झाले नाहीत. त्यामुळे दायित्वाचा आकडा कमी झालेला नाही.

आयुक्त रमेश पवार यांनी खातेप्रमुखांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, काही पूर्ण झालेली कामे अजूनही ईआरपीमध्ये आहेत तसेच काही कामांच्या प्राकलनांची दुबार नोंद झालेली आहे. तसेच काही कामांच्या निविदा रकमांची अद्ययावत नोंद झालेली नाही. या बाबींमुळेच दायित्वाचा आकडा वाढलेला दिसत असून, ही बाब पाहता ईआरपी कार्यप्रणालीतून आवश्यक असलेली कामे, पूर्ण झालेली कामे, सुरू ठेवायची कामे व चालू अंदाजपत्रकातील हाती घ्यावयाच्या कामांच्या याद्या विभागप्रमुखांनी तत्काळ लेखा विभागाकडे सादर करण्यास कळविले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT