उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी पाच हजार पोलिसांचा ताफा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे कडक नियोजन केले आहे. सुमारे पाच हजार पोलिसांसह होमगार्डच्या जवानांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात राहणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम करण्यासोबतच गुन्हे होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. गणरायाचे स्वागत वाजत-गाजत होणार असून, 10 दिवस धूमधडाक्यात, भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. देखावे पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

असा असेल शहरात फौजफाटा
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपआयुक्त, सात सहायक आयुक्त, 40 पोलिस निरीक्षक व 225 सहायक व उपनिरीक्षक पोलिस अधिकार्‍यांचा बंदोबस्त राहील. त्याचप्रमाणे तीन सत्रांत तीन हजार पोलिस अंमलदारांचा फौजफाटा तैनात राहील. अतिरिक्त कुमक म्हणून 150 कर्मचारी असतील, तर एक हजार 50 होमगार्ड जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे क्यूआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्या प्रत्येकी 1-1 तुकड्या राहणार आहेत. शहरातील सुमारे 376 गणेश मंडळांना शहर पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आली असून, यामध्ये 39 मौल्यवान गणपती असल्याचे विशेष शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

ग्रामीण भागातही चोख बंदोबस्त

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार बंदोबस्ताची आखणी झाली आहे. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी बंदोबस्ताबाबतचे निर्देश सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत. दोन पोलिस उपअधीक्षक, सहा पोलिस निरीक्षक, 24 सहायक निरीक्षकांसह 266 पोलिस अंमलदार, 150 नवप्रविष्ट अंमलदार राहतील. एक हजार होमगार्डचे जवान राहणार असून, सहा दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या व दोन एसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तात राहतील.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT