उत्तर महाराष्ट्र

नाशिक : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश

गणेश सोनवणे

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
भिलवाड परिसरात रस्त्याचा अंदाज न आल्याने सुमारे 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाच्या अथक प्रयत्नाने व ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले. सुमारे दीड ते दोन वर्षाचा हा बिबट्या होता. तालुक्यातील ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे.

बाळासाहेब पोपट जाधव यांची गट क्रमांक 50 मध्ये विहीर आहे. त्यात सोमवारी (दि.27) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या पडल्याची माहिती वनविभागास भ्रमणध्वनीद्वारे समजली. वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत लाकडाचा एक ओंडका दौराच्या सहाय्याने बिबट्याच्या आधारासाठी विहिरीत सोडला. या वेळी परिसरात जोरदार सुरू असलेला पाऊस रेस्क्यू ऑपरेशनच्या कामकाजात व्यत्यय आणत होता. यानंतर वनविभागाने मदतकार्य थांबवून दुसर्‍या दिवशी सकाळी सातला पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. वन कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्यास सुखरूप पिंजर्‍यात जेरबंद केले. बिबट्यासह पिंजरा देवळा वनपरिक्षेत्र कार्यालयात आणला. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा घाडगे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. दीड ते दोन वर्षाची ती मादी असल्याचे निदर्शनास आले. मादी तंदुरुस्त व सुद़ृढ असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के. पी. ढुमसे यांनी दिली.

हे रेस्क्यू ऑपरेशन नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहायक वनसंरक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भिलवाडचे ग्रामस्थ, देवळा वनविभागाचे कर्मचारी यांनी यशस्वीपणे कामगिरी फत्ते केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT