कोल्हापूर : शिंगणापूरचे ग्रामस्थ महापालिकेचे मतदार | पुढारी

कोल्हापूर : शिंगणापूरचे ग्रामस्थ महापालिकेचे मतदार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराजवळ असलेल्या शिंगणापूर ग्रामपंचायतीचे नागरिक महापालिका हद्दीतील फुलेवाडी प्रभागात मतदार दाखविण्यात आले आहेत. शिंगणापूर गावातील तब्बल 465 ग्रामस्थ महापालिकेचे मतदार बनले आहेत, असा आरोप माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला. विधानसभेच्या मतदार यादीत असलेली शेकडो नावेही गायब झाल्याचे यावेळी कदम यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भातील हरकतीही कदम यांनी दाखल केल्या.

महापालिका प्रशासनाने निवडणूकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सद्य:स्थितीत हरकती घेतल्या जात आहेत. त्यातून काही प्रभागातील हजार ते दोन हजार नावे दुसर्‍याच प्रभागात गेल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी तीन हजारांवर मतदारांची नोंद इतर प्रभागात झालेली आहे. मतदार याद्यांचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होत आहेत. अनेक प्रभागात पती एका प्रभागात तर पत्नी दुसर्‍या प्रभागात मतदार अशा नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांतून प्रचंड संताप व्यक्‍त केला जात आहे. शहरातील मतदारांचा घोळ सुरू असतानाच आता धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. चक्‍क शिंगणापूरमधील ग्रामस्थांची फुलेवाडी प्रभागात मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने होत आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार 92 नगरसेवक असणार आहेत. त्यासाठी 31 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 व 2 नगरसेवकांचा एक असे प्रभाग आहेत. 23 जूनला महापालिकेने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. एकेका प्रभागात 15 हजारांपासून 18 हजारांपर्यंत मतदार आहेत. बीएलओंनी मतदार याद्यात प्रचंड चुका केल्या आहेत. त्याचा फटका आता बसत आहे. हरकतींचा संख्या वाढत आहे. त्याची दुरुस्ती करताना प्रशासनाला नाकी नऊ येण्याची शक्यता आहे.

Back to top button