उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारला वाहन क्रमांकांच्या बनावट नोंदी करणारी साखळी उघड, ‘इतक्या’ वाहनांची बनावट नोंद

गणेश सोनवणे

नंदुरबार (पुढारी व्रुत्तसेवा)

आरसीसी बुक मध्ये खाडाखोड करीत परिवहन विभागाच्या पोर्टलवर खोट्या नोंदी करून तसेच नंदुरबार येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 83 विविध वाहनांची बेकायदेशीरपणे नोंदणी करुन शासनाचा सुमारे 66.6 लाख रुपयांचा महसूल बुडविण्याचा महाघोटाळा उघडकीस आला असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली असता, हस्तलिखीत अभिलेखावर नोंदी नसलेले 83 निवडक आकर्षक (VIP) वाहन क्रमांक हे इतर वाहनांना वापरून तसेच शासनाला कोणताही BMV टॅक्स न भरता ते वाहन रजिस्टर केल्याचे दाखविले. तसेच विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या 83 वाहनांच्या इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन शिवाय बनावट आर.सी. बुक तयार करुन शासनाची अंदाजित 66,59,900/- रुपयाची फसवणुक केली म्हणून 83 वाहन धारक, एजंट, तसेच इतर संबंधीत व्यक्तींविरुध्द गु.र.नं. 395/2022 भा.दं.वि. कलम 420, 465, 467, 468, 120 (ब), 34 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66, 66 (क) प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेवून अटक करण्यात येईल. गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच सदर गुन्ह्यामध्ये शासनाची फसवणूक केल्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नाही; असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

असा उघड झाला घोटाळा
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील एक वाहन ट्रान्सफर करण्यासाठी गेले असता तेथील लिपीक यांना त्या वाहनाच्या आर. सी. बुकबाबत शंका आल्याने त्यांनी त्या वाहनाबाबत प्रादेशीक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे चौकशी केली असता ते वाहन क्रमांक निवडक आकर्षक (VIP) श्रेणीतला असल्याचे आढळून आले. तसेच त्या क्रमांकावर कोणतेही वाहन क्रमांकाचे रजिस्ट्रेशन झालेले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादेशीक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथील सर्व अभिलेख संबंधित लिपीक श्री. बागुल यांनी तपासले असता कोणीतरी बनावट आर. सी. बुक बनविल्याचे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिल्लक असलेले निवडक आकर्षक (VIP) क्रमांकाचा कोणीतरी वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हस्तलिखीत अभिलेखावर नोंदी नसलेले 83 निवडक आकर्षक (VIP) वाहन क्रमांकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली. सदर वाहन पोर्टलवरील बॅकलॉग साईटवर पाहणी केली असता ते वाहन क्रमांक रजिस्ट्रेशन असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरची बाब लिपीक श्री. बागुल यांनी तात्काळ मा. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव तसेच मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांना कळवून मा. परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई व वरीष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार किरण बिडकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जावून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली व त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती सांगितली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना चौकशी करणेबाबत आदेश दिले आणि मूळ प्रकरण उघडकीस आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT