

सातारा : पुढारी वृत्तसेवा
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असलेल्या जरंडेेश्वर शुगर मिल्स कारखान्याने ईडी कारवाई झाल्यानंतरही यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यंदाच्या हंगामात राज्यातील दोन नंबरचे ऊस गाळप व साखर उत्पादन कारखान्याने घेतले आहे. किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड कारखाना बंद असताना या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस नेल्यामुळे शेतकर्यांनाही दिलासा मिळाला.
2021-22 ऊस गाळप हंगामाच्या सुरूवातीस, जरंडेश्वर शुगर मिल्सला ईडी कारवाईचा सामना करावा लागला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पूर्वीचा सहकारी साखर कारखाना खासगी कंपनीला विकला. यामध्ये आर्थिक नियमितता झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली. याच प्रकरणात गतवर्षी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या कुटूंबाचीही चौकशी झाली. मात्र, यावेळी ना. पवार यांनी कारखाना खरेदी प्रक्रियेत नियम पाळल्याचे सांगितले होते.
ईडीच्या कारवाईनंतर आयकर विभागानेही जरंडेश्वरवर कारवाई केली होती. यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, हंगाम सुरू होताच सर्व नियमांचे पालन करत साखर आयुक्तांकडून गाळप परवाना कारखान्याने मिळवला होता. 2020-21 हंगामात जरंडेश्वरने 14.38 लाख टन उसाचे गाळप केले. यापोटी कारखान्याने शेतकर्यांना 420.67 कोटी रूपयांची एफआरपी दिली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात तब्बल 19.98 लाख टन उसााचे गाळप केले. तर एफआरपीपोटी तब्बल 525.5 कोटी रूपये शेतकर्यांना दिले.
यंदा राज्यात सोलापूरच्या माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने 24.78 लाख टन गाळप करून 531 .79 कोटी रूपयांची एफआरपी अदा केली. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्याने राज्यात दोन नंबरचे ऊस गाळप करून विक्रम केला.
यंदाच्या हंगामात किसनवीर, खंडाळा आणि प्रतापगड साखर कारखाने बंद पडल्याने या तालुक्यात लाखो टन ऊस उभा होता. त्यामुळे या उसाची तोड करून गाळप करण्याचे आवाहन सरकारसह साखर आयुक्तांसमोर होते. यामध्ये जरंडेश्वर कारखान्याने महत्वाची भूमिका बजावत या कारखान्यातील हजारो हेक्टरवरील उसाचे गाळप केले.