उत्तर महाराष्ट्र

चाळीसगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

backup backup

जळगाव पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाकडी गावात पालकमंत्री व भाजपचे नेते आमदार गिरीष महाजन यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी एकत्र पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकडी येथील 60 वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. बरोबरच शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. अनेक जनावरे जागेवरच मृत्यूमुखी पडले आहेत. या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. तसेच धुळे- औरंगाबाद महामार्गावरील औट्रम (कन्नडचा) घाटातील अडथळे दूर करीत महामार्ग वाहतुकीसाठी तातडीने मोकळा करावा, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे परिसरातील तितूर, डोंगरी या नद्यांना पूर आला. या पुराचे पाणी नदी काठावरील गावांमध्ये व  घरांमध्ये शिरले. त्यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दुपारी चाळीसगाव शहरासह वाकडी या गावाला भेट देवून पाहणी केली.

यावेळी येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची माहिती देऊन नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांचेसोबत खासदार उन्मेष पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतली नुकसानीची माहिती

पालकमंत्री वाकडी येथे नुकसानीची पाहणी करीत असतानाच चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीची  माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेशी दूरध्वनीवर संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.  तसेच नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश देऊन शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही संवाद साधला.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत

पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी सांगितले, सोमवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसारख्या परिस्थितीमुळे तितूर व डोंगरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीच्या तीनही पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. या तुकडीच्या माध्यमातून औट्रम घाटात मदतकार्य सुरू आहे. चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी आदी गावांतील नदी काठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

तसेच या गावांमधील पशुधनही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांना अवगत करण्यात आले आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत या विषयी माहिती सादर करण्यात येईल. तसेच नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही पालकमंत्री  यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्कता बाळगावी

पूर परिस्थितीनंतर साथीचे आजार पसरू नयेत याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावयाची आहे. त्यासाठी जल शुध्दीकरण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. पूरग्रस्त भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके तैनात करून नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

खासदार, आमदारांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

तत्पूर्वी चाळीसगाव शहरातील अतिवृष्टीची आज सकाळी खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक मुंडे यांनी पाहणी केली. त्यांनी औट्रम घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहने अडकली आहेत. त्यातच पाऊस सुरू आहे. या घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. असे असले, तरी औट्रम घाटातील राडारोडा तातडीने दूर करीत घाट मार्ग वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्यात येईल, असे महामार्ग विभागाने सांगितले.

नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने नागरिक सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

हे ही वाचलत का :

एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT