टोकियो पॅरालिम्पिक : उंच उडीत मरियप्पनची रौप्य, तर शरदची कांस्यपदकाला गवसणी - पुढारी

टोकियो पॅरालिम्पिक : उंच उडीत मरियप्पनची रौप्य, तर शरदची कांस्यपदकाला गवसणी

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने आणखी तीन पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत २ सुवर्णांसह एकूण १० पदके जिंकली आहेत. आज मंगळवारी (दि. ३१) मरियप्पन थंगावेलूने पुरुषांच्या उंच उडीच्या टी ६३ प्रकारात रौप्य आणि शरद कुमारने कांस्य जिंकले.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगीरी सुरू आहे. मरिअप्पन थंगावेलूने रौप्य पदक, तर शरद कुमारला कांस्यपदक मिळाले.

पुरुषांच्या उंच उडी टी ६३ स्पर्धेत मरिअप्पनने १.८६ मीटर तर शरदने १.८३ मीटर उडी मारली. अमेरिकेचा सॅम क्रू सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाला. त्याने (१.८८) मीटर उडी मारली. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या १० वर पोहोचली आहे.

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने उंच उडी या खेळ प्रकाराता तीन पदके जिंकली आहेत. मरिअप्पन आणि शरद याच्या आधी निषाद कुमारने रविवारी पुरुषांच्या उंच उडी टी ४७ स्पर्धेत आशियाई विक्रमासह रौप्य पदक जिंकले.

मरिअप्पन थंगावेलूने पॅरालिम्पिक स्पर्धेत सलग दुसरे पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने यापूर्वी रिओ २०१६ मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते.

भालाफेक स्पर्धेतील पॅरा अॅथलीट देवेंद्र झाझारियाच्या नावावर पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्ण (२००४, २०१६) पदकांची नोंद आहे.

सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १० पदके जिंकली आहेत. भारताच्या खात्यात आता २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने २ सुवर्णांसह ४ पदके जिंकली होती.

PM नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरिअप्पन आणि शरद यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करून दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.

सिंहराजला नेमबाजीत कांस्य पदक…

भारताच्या सिंहराजने मंगळवारी टोकियो पॅरालिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ (SH1) च्या फायनलमध्ये तिसरे स्थान मिळवले. हरियाणाच्या पॅरा शूटरने २१६.८ गुण मिळवत भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

Back to top button