उत्तर महाराष्ट्र

नाशिक, मालेगावी लसीकरण मंदावले

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात 'हर घर दस्तक' 2.0 मोहिमेंतर्गत लसीकरणाला गती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. नाशिक व मालेगाव शहरात लसीकरण मंदावल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी मंगळवारी (दि. 7) आरोग्य यंत्रणासह अन्य संबंधित विभागांची बैठक घेणार आहेत.

कोरोनाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दररोजची बाधित आढळणार्‍यांची संख्या दीड हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्वसामान्यांना मास्क वापरण्याचे आवाहन करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा वाढता धोका बघता जिल्हा प्रशासनाने सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हर घर दस्तक' मोहिमेंतर्गत पहिल्या, दुसर्‍या टप्प्यासह बूस्टर डोसचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी दि. 7) आरोग्य यंत्रणेसह अन्य संबंधित विभागांची बैठक बोलविली असून, त्यामध्ये लसीकरणावर सविस्तर चर्चा होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 57 लाख 40 हजार 814 पात्र नागरिकांपैकी 51 लाख 9 हजार 346 जणांनी लशीचा पहिला डोस घेतला असून, त्याचे प्रमाण 89 टक्के आहे. तसेच 42 लाख 96 हजार 859 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला असून, त्याची टक्केवारी 75 इतकी आहे. तर आतापर्यंत एक लाख 38 हजार 24 व्यक्तींनी बूस्टर डोस घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढली असताना, नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्रांत लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये लसीकरणाचा टप्पा वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाला योग्य ते निर्देश देण्यात येणार असल्याचे गंगाथरन डी. यांनी सांगितले.

दुसर्‍या डोसचे प्रमाण 74.53 टक्के
नाशिकमध्ये लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या 15 लाख 12 हजार 567 इतकी आहे. त्यापैकी 13 लाख 91 हजार 123 नागरिकांना प्रथम डोस देण्यात आला असून, त्याचे प्रमाण 92.4 टक्के आहे. त्याचवेळी 74.53 टक्के नागरिकांनीच दुसर्‍या डोस घेतला आहे. मालेगावमधील 5 लाख 50 हजार 639 व्यक्तींपैकी 60.80 टक्के जणांनी पहिला, तर 24.78 टक्के व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. या दोन्ही शहरांतील 66897 नागरिकांनी बूस्टर डोेस घेतला आहे.

जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. दर आठवड्याला आरोग्यसह इतर संबंधित विभागांच्या नियमित बैठका घेतल्या. या बैठकांचे यश म्हणजे जिल्ह्यातील पहिल्या डोसचे प्रमाण 82 वरून 89 टक्क्यांपर्यंत व दुसर्‍या डोसच्या प्रमाणात 68 वरून 74.85 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हर घर दस्तक 2.0 मोहिमेत अधिकाधिक लसीकरणाचा आमचा मानस असून, त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी

  • आरोग्य संबंधित विभागांची बैठक घेणार
  • मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन
  • आतापर्यंत 1 लाख 38 हजार 24 व्यक्तींना बूस्टर डोस

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT