उत्तर महाराष्ट्र

आदिवासी तरुणाईने साहित्यातून घ्यावी प्रेरणा : जागतिक आदिवासीदिन

अंजली राऊत

नाशिक : जिजा दवंडे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना, आदिवासी जनसमुदायात काय बदल घडले, हे पाहणे औचित्याचे ठरावे. हा समाज मूळ समाजापासून दूर डोंगर-दर्‍यात राहणारा असला, तरी ब्रिटिश राजवटीत जल, जंगल, जमीन यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेक उठाव या समाजातून घडून आले. सिधो, कान्हो, तंट्या भिल, बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि इतरही अनेक वीरांनी स्वातंत्र्य समरात भाग घेतला, अनेकांनी प्राणाची आहुती दिली.

मात्र आजही आदिवासी समाज अत्यंत प्राथमिक गरजांसाठी झगडत असलेला दिसतो. सरकारी अनास्था, भ्रष्टाचार आणि समाजातील अज्ञान आणि एकीचा अभाव अशी अनेक कारणे त्यासाठी सांगता येतील. त्या बरोबरच या समजाविषयी असणारे गैरसमज हेही एक कारण असल्याचे दिसून येते. चित्रपटांतून आदिवासींचे त्रोटक, एकांगी आणि अतिरंजित चित्र समाजापुढे उभे करण्यात आलेले दिसते. अंगाला रंग लावून, केसात पिसे खोचून, दारू पिऊन नाचणारे असे चित्रण सामान्यतः करण्यात आले आहे. मराठी साहित्यातही आदिवासी साहित्य फारसे आलेले नाही. साठोत्तरी वाङ्मयीन कालखंडामध्ये दलित साहित्याने आपला वेगळा ठसा उमटविलेला दिसून येतो. 'बलुतं', 'उपरा', 'अक्करमाशी' यासारख्या आत्मकथनातून तत्कालीन समाजजीवनाचे, हालाखीचे दर्शन घडून आले. त्याचबरोबर या आत्मकथनाने प्रस्थापितांना जबरदस्त हादरा देण्याचे काम केले. सामाजिक विषमता, दारिद्य्र, अंधश्रद्धा, अज्ञान, रुढी-परंपरा, जातीयता यासारख्या सामाजिक समस्या जगापुढे आल्या. त्यामुळे समाजमन ढवळून निघाले. सामाजिक कार्यकर्ते, राज्यकर्ते अशा पीडित, दलित समाजाच्या उत्थानासाठी पुढे आले. त्याचबरोबर पिढ्यान्पिढ्या मागे पडलेल्या समाजातील नवयुवकांमध्ये या साहित्याने एक स्फुल्लिंग पेटले, असे आपणास दिसून येईल.

अलीकडच्या काळात काही आदिवासी साहित्यिक लिहीत असल्याचे दिसून येते, हेही आश्वासक चिन्ह म्हणता येईल. डॉ. गोविंद गारे, डॉ. विनायक तुमराम, डॉ. महेश्वरी गावित, वाहरू सोनवणे, नजुबई गावित हे लेखक दमदार लिहीत असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारचे एक वेगळे काम कोकणा आदिवासी समाजात जन्माला येऊन, परंपरेने चालत आलेल्या दारिद्य्राशी दोन हात करीत, आज उपजिल्हाधिकारी पदावर असलेले हिरामण झिरवाळ यांचे 'जेथोड' आत्मकथनाने केले आहे. मुळात डोंगर-दर्‍यांत राहणारा, निसर्गाशी झगडणारा हा कोकणी माणूस प्रचंड सोशिक आणि तितकाच समाधानी आहे. त्यामुळे त्यांच्यात बंडखोरपणा आढळत नाही. मात्र, त्यांच्यात कमालीचा चिवटपणा, समाधानी वृत्ती दिसून येते. 'जेथोड' हे केवळ हिरामण झिरवाळ यांचे आत्मकथन न ठरता, तत्कालीन आदिवासी समाजजीवनाचे विदारक परिस्थितीचे चित्रण करणारे ऐतिहासिक दस्तऐवज वाटते. 'जेथोड' म्हणजे पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य, सरपणाची करून ठेवण्याची तरतूद. या कथानकातील चित्रण केवळ त्या लेखकाचे न ठरता, त्या काळातील कोकणा समाजातील कोणाही तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे ठरते. यात आदिवासी कोकणा समाजाला पोटा-पाण्यासाठी करावी लागणारी शेतीची कामे, निसर्गाचा लहरीपणा, अपुरी साधनसामग्री यामुळे होणारे हालअपेष्टांचे चित्रण आले आहे. कसाबसा फक्त उदरनिर्वाह चालावा, यासाठी वर्षभर या समाजाची चालणारी कसरत बारीक-सारीक तपशीलासह या पुस्तकात आली आहे.

निसर्ग हाच देव मानून त्यावर उपजीविका करणारा हा समाज कंदमुळे खाऊन पोट भरणारा. नागली, भात या वर्षभरातून एकदाच येणार्‍या पिकावर गुजराण करणारा. दिवाळी सणदेखील गोडधोड न करता, शेतातल्या पिकांप्रति, गायी गुरांप्रति आणि फुललेल्या निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा. निसर्गाचे प्रतीक म्हणून डोंगर्‍यादेव या उत्सवाचे सुंदर वर्णनही यामध्ये आलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी होणारी फरपट, घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे लवकर शिकून नोकरी करावी या विचाराने डी. एड. करणे, त्यानंतर पुढे अनुकूलता लाभली की, पुढे जाण्याची जिद्द उराशी बाळगून शिक्षकाची नोकरी करता करता, प्रशासनात मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न लेखक पाहतो. एमपीएससी परीक्षा पास होतो. पहिल्याच प्रयत्नात तहसीलदार म्हणून नियुक्ती होते. लेखकाचा हा संपूर्ण प्रवास वाचकांना थक्क करणारा तर आहेच. परंतु, संपूर्ण तरुण वर्गाला प्रेरणा देणारा ठरणारा आहे. आजच्या स्पर्धा परीक्षेमागे कस्तुरीमृगाप्रमाणे धावणार्‍या आणि यश न मिळाल्यावर नैराश्य येणार्‍या मुलांसाठी महत्त्वाचा संदेश या आत्मकथनात आलेला आहे. या आत्मचरित्रातून आजच्या आदिवासी तरुणाईने प्रेरणा घेऊन आपले विश्व विस्तारण्याची गरज आहे. तसा संकल्प जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी तरुणांनी केला, तर नक्कीच येत्या काळात 9 ऑगस्ट हा दिवस 'आदिवासी दीन' न राहाता, खर्‍या अर्थाने आदिवासी दिन साजरा करता येईल हे नक्की.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT