उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ई-रजिस्ट्रेशनसाठी आज शहरातील बिल्डरांचे प्रशिक्षण

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात ई-रजिस्ट्रेशन प्रणाली सुरू करण्यात आली असून, या प्रणालीतील पुढचा टप्पा म्हणजेच या प्रणालीअंतर्गत बिल्डरांकडेच दस्तांचा प्रथम विक्री करारनामा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बिल्डरांना या प्रणालीची माहिती व्हावी यादृष्टीने शहरातील बिल्डरांबरोबरच क्रेडाई आणि नरेडकोच्या प्रतिनिधींसाठी गुरुवारी (दि.2) प्रशिक्षण आयोजित केले आहे.

प्रशिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या अशोका हॉलमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 6 या कालावधीत होणार असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक बाळासाहेब घोंगडे यांनी दिली आहे. प्रथम विक्री करारनामा दस्तांची ई-रजिस्ट्रेशन प्रणालीअंतर्गत नोंदणी प्रक्रियेस गती मिळावी याकरिता निबंधक कार्यालयातील कर्मचारी तसेच स्टेक होल्डर्स यांचे प्रशिक्षण होत आहे. अधिकाधिक प्रथम विक्री करारनामा दस्त नोंदणी व्हावी तसेच निबंधक नोंदणी कार्यालयात होणार्‍या गर्दीला आळा बसून नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील विकासक, वकील, एएसपी, क्रेडाई, नरेडको, एमसीएचआय यासारख्या संघटना सहभागी होत आहेत. संबंधितांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून ई-रजिस्ट्रेशन प्रणाली समजावून घ्यावी. प्रशिक्षण नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ई-रजिस्ट्रेशन प्रणालीमुळे बिल्डरांकडेच नागरिक विकत घेत असलेल्या दस्तांची प्रथम विक्री करारनामा होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत तर होईलच शिवाय दस्त नोंदणी कार्यालयात माराव्या लागणार्‍या फेर्‍या नागरिकांना माराव्या लागणार नाहीत. आजमितीस सर्वच निबंधक नोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. खरेदी-विक्रीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊनही अनेकदा दस्त नोंदणीकरता तारीख आणि वेळ मिळत नाही. यामुळे नागरिकांना अनेक दिवस त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. परंतु, आता मालमत्ता विकत घेणार्‍या बिल्डरकडेच प्रथम दस्त करारनामा होणार असल्याने मिळकतधारकांना अनेक सुविधा मिळू शकणार आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT