नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड चिंच झोडण्याचे काम करत असताना घरटे उध्वस्त झालेले सुमारे दोन डझन पाणकावळे मागील बारा दिवसांपासून वनविभागाचा पाहुणचार घेत आहेत. त्यामुळे पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी आता त्याची झुंज सुरू झाली आहे. लवकरच तो नैसर्गिक अधिवासात मोकळा श्वास घेण्याच्या तयारी आहे. वनविभाग आणि वन्यप्रेमींकडून त्याच्या प्रकृती सुधारणेसाठी पूर्णत: प्रयत्न केले जात असून, त्याच्या पंखात बळ भरण्यासाठी निरीक्षण केले जात आहेत.
सिन्नर शहरातील हॉटेल पंचवटी मोटेल्सच्या आवारात ३१ ऑगस्ट २०२२ रोजी संशयित इम्रान शबीर सय्यद (32), सर्वर शकील शेख (38), सादिक शकील शेख (30) तिघेही रा. सिन्नर यांनी आंबट चिंचेच्या झाडाचे वाळलेले चिंच झोडण्याचे काम करत हाेते. त्याचवेळी अनेक पक्ष्यांचे घरटे यात उध्दवस्त झाले. त्यामध्ये पाणकावळा (102) व ढोकरी (13) यासारख्या निष्पाप जीवांचा दुदैवी मृत्यू झाला होता. तर 22 जखमी पक्ष्यांचे अर्थात पाणकावळे रेस्क्यू करण्यात आले होते. या प्रकरणात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाने रेस्क्यु केलेले पाणकावळे उंच झाडावरून थेट जमिनीवर आपटले होते. त्यामुळे हे पक्षी अतिशय कमकुवत झाले होते. त्यात काही लहान पिल्लांचाही समावेश होता. इको-इको फाउंडेशन टीमच्या मदतीने वनविभागाने हे सर्व पाणकावळे नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर इको इको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून व देखरेखीखाली वनविभागाकडून उपचार सुरू करण्यात येत आहे. पाणकावळ्यांना दिवसांतून दोन वेळेस अन्न दिले जात आहे. त्यांना खास माशांची मेजवानी मिळत आहे.
दरम्यान, जखमी पानकावळ्यावर अद्यावत उपाचर केले जात आहे. पानकावळे ठेवलेल्या रूमचे तापमान कायम ठेवण्यासाठी खास ब्लबची व्यवस्था करण्यात आली आहे. तर त्यांच्यासाठी दोन व्यासपीठ तयार करण्यात आले असून, त्यांना नैसर्गिक अधिवासात असल्याचे भासविले जात आहे. मोकळ्या प्रशस्त जागेसह पिंजरा तैनात करण्यात आला आहे. पाणकावळ्यांनाही आवडीचे खाद्य मिळत असल्याने ते माशांवर मनसोक्त ताव मारत असल्याचे चित्र आहे.
गेल्या बारा दिवसांपासून पाणकावळ्यांचा पाहुणचार सुरू आहे. त्याला पाणकावळ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ते अतिशय अशक्त झाल्याने तब्येत सुधारण्यासाठी अजून काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पुर्णपणे सशक्त झाल्यानंतरच त्यांना आकाशात मुक्त करण्यात येईल.
-वैभव भोगले, मानद वन्यजीव रक्षक