पौड : जोरदार पावसामुळे उपनगरांत दाणादाण; राम नदीचे पाणी लोकवस्तीत | पुढारी

पौड : जोरदार पावसामुळे उपनगरांत दाणादाण; राम नदीचे पाणी लोकवस्तीत

बावधन/पौड : बावधन परिसरामध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडली. राम नदीला पूर आल्याने लोकवस्तीत पाणी शिरले. पावसाच्या पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी मोटारीसुद्धा 30 ते 40 फूट लांब वाहून गेल्या. रियान इंटरनॅशनल शाळेलगत असलेली भिंत कोसळून येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.

परंतु, नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने तातडीने राडारोडा हाटवून हा रस्ता पुन्हा सुरू केला. या रस्त्यावरून राम नदीचे पाणी वाहत असल्याने तो बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर काही चारचाकी वाहने काही काळ पाण्यात आडकली होती. तसेच एक दुचाकीस्वार वाहून जाता जाता वाचला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बावधनचे माजी उपसरपंच दिलीप दगडे यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. राम नदी गेल्या काळात कधीच एवढी दुथडी भरून वाहिली नव्हती. आज बावधनकरांना तिचे रौद्ररूप दिसून असल्याचे उद्योजक बापूसाहेब दगडे यांनी सांगितले. परिसरात पावसाचे पाणी जिकडे वाट मिळेल तिकडे वाहत होते. तसेच काही घरांत पाणी शिरल्याचे नागरिकांनी सांगितले.

Back to top button