नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
क्षुल्लक कारणावरून एकाने धारदार हत्याराने केलेल्या वाराने युवकाच्या हाताचा पंजाच मनगटावेगळा झाला. ही भयंकर घटना मेहवीनगरच्या गल्ली नंबर तीनमध्ये सोमवारी (दि.21) रात्री सव्वासातच्या सुमारास घडली.
जखमी शेख फैजुल रहेमान शेख अनिस (22) याने पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली. तो गल्लीत दुचाकी धूत असताना शेजारील इब्राहिम (पूर्ण नाव माहिती नाही) आला आणि माझ्याकडे नेहमी रागाने का पाहतो, अशी कुरापत काढून वाद घातला. त्याला समजविण्याचा प्रयत्न करित असतानाच त्याने धारदार हत्याराने वार केला. त्यात फैजुलच्या उजव्या हाताचा पंजा पूर्णपणे कापला गेला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंजा निकामी झाल्याने तो शस्त्रक्रियेने जोडला जाऊ शकला नाही. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक सुपनर तपास करत आहेत.