उत्तर महाराष्ट्र

नाशिक : उन्हामुळे शहरातील सिग्नल दुपारी बंद होण्याची शक्यता

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाची तीव्रता वाढल्याने नाशिककर हैराण झाले असून, अनेक जण सावलीच्या शोधात असतात. उन्हामुळे अनेक जण दुपारचा प्रवास टाळत असल्याचेही चित्र आहे. सिग्नलजवळ काही वेळ थांबावे लागत असल्याने तेथेही चटका जाणवत असल्याने वाहनचालक सिग्नलच्या अलीकडे असलेल्या झाडाखाली किंवा इतर सावलीत थांबणे पसंत करत आहेत. त्यामुळे शहरातील सिग्नल दुपारी काही वेळ बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याआधी नागपूरमध्ये दुपारी 12 ते 4 या वेळेत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

उन्हामुळे अनेक जण दुपारचा प्रवास वा काम सकाळी किंवा सायंकाळच्या सुमारास करण्यावर जोर देत आहेत. नागपूरमध्ये 164 सिग्नलपैकी 21 सिग्नल दुपारी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही सिग्नलचे सर्वेक्षण करून सिग्नलची वेळ, दुपारची गर्दी, वाहनांची संख्या आदी बाबी तपासून सिग्नल बंद ठेवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलिस आयुक्तांना याबाबत अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय लागू होईल. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत शहरातील काही सिग्नल तात्पुरते बंद ठेवून दुचाकीस्वारांना दिलासा देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनाही होतोय त्रास
उन्हामुळे अनेक जण दुपारी वाहतूक नियम मोडत असल्याची बाब समोर येत आहे. शहरातील महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, आयटीआय, उपनगर, त्र्यंबकरोड, सीबीएस, टिळकवाडी, शरणपूर, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका येथील सिग्नलजवळ हे प्रकार पाहावयास मिळतात. वाहतूक पोलिसांनाही उन्हाचा त्रास होत आहे. त्यामुळे वाहतूक नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करताना त्यांनाही अडचणी येत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT