सातारा : खा. शरद पवार, ना. अजितदादांच्या उपस्थितीत नव्या संचालक मंडळाची खलबते

किसन वीर कारखान्याच्या अनुषंगाने खलबते करताना खा. शरद पवार, ना. अजित पवार, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील व इतर.
किसन वीर कारखान्याच्या अनुषंगाने खलबते करताना खा. शरद पवार, ना. अजित पवार, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील व इतर.

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : भूलथापा मारून, खोटं बोलून काहीही साध्य करता येत नाही. नौटंकी जास्त काळ चालत नाही, हे किसनवीर कारखान्याच्या 52 हजार सभासदांनी दाखवून दिले आहे. आ. मकरंद पाटील यांच्या हातात शेतकर्‍यांनी कारखाना दिला आहे. हा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आम्ही तातडीने अ‍ॅक्शन प्लॅन करत आहोत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी वाढे, ता. सातारा येथे आयोजित केलेल्या विविध विकासकांच्या उद्घाटनप्रसंगी दिली. दरम्यान, कार्यक्रम संपताच शासकीय विश्रामगृहावर खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ना. अजितदादा पवार, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, आ. शशिकांत शिंदे व नव्या संचालक मंडळाची रात्री उशीरापर्यंत खलबते सुरू होती.

वाढे, ता. सातारा येथे ग्रामपंचायत सदस्य मेघा नलावडे यांनी आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ना. अजितदादा उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, सुनील माने, बाळासाहेब सोळस्कर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

ना. अजितदादा म्हणाले, कारखाना चालवणे येड्यागबाळ्याचे काम नाही. एक पण संस्था नीट चालवायची नाही अन् दुसर्‍यांच्या नावाने पावत्या फाडायच्या. किसनवीर चालवणे हे आता मोठं आव्हान आहे. परंतु ते आम्ही करू. आम्ही बंद पडलेले कारखाने सुरू केले आहेत. सोमेश्वर कारखान्याची अवस्था वाईट होती पण आता कारखाना 8 हजार 500 मेट्रीक टनाने चालला आहे. माळेगाव कारखाना 9 ते 9500 ने चालला आहे. छत्रपती कारखाना 3500 ने चालत होता तो 7 ते 7500 मेट्रीक टन गाळपाने चालला आहे. 52 हजार सभासद ही काही छोटी गोष्ट नाही. कारखान्याबद्दल बैठक घेवून काय लाईन ऑफ अ‍ॅक्शन असली पाहिजे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने काय मदत केली पाहिजे? सहकार विभागाने काय निर्णय घेतले पाहिजे? बँकांकडून काय मदत घेतली पाहिजे? शॉर्ट, लाँग टर्मचे निर्णय असतील ते घ्यावे लागतील. पवारसाहेब म्हणतात अजित निर्णय घेताना पुढील 25 वर्षाचा विचार करायचा तात्पुरता निर्णय घ्यायचा नाही. ही त्यांची शिकवण आहे.

कार्यक्रमास किरण साबळे-पाटील, सारंग पाटील, तेजस शिंदे, वनिता गोरे, निलेश नलावडे, मेघा नलावडे, सरपंच संदेश देखणे, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार कांताताई नलवडे यांनी आभार मानले.

वाढे येथील कार्यक्रम संपल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, नितीनकाका पाटील, शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, बाबासाहेब कदम व नवनिर्वाचित संचालक मंडळाची तातडीची बैठक झाली. नव्या संचालक मंडळाने खा. शरद पवार व ना. अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले व किसनवीर कारखाना कर्जमुक्त करण्यासाठीची गळ घातली. रात्री उशीरापर्यंत खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत किसनवीर वाचवण्यासाठीची खलबते सुरू होती.

साहेबांनी बाळासाहेबांची उमेदवारी कापली पण मी बाळासाहेबांना डोळा मारला

अजितदादांनी वाढे येथील कार्यक्रमात जुन्या आठवणीद्वारे एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, लोकांचं प्रेम असेल ना तर काहीही होवू शकतं. तेच बाळासाहेबांच्या बाबतीत झालं होतं. मी साहेबांना त्यावेळी सांगत होतो, बाळासाहेबांना उमेदवारी द्यावी लागेल. पण साहेबांनी त्यावेळच्या खासदारांचं ऐकलं. मग मी बाळासाहेबांना हळूच डोळा मारला. आधीच्या निवडणुकीला ते कराड उत्तरमधून चार-पाच हजारांनी निवडून आले होते. नंतर मात्र अपक्ष उभे राहून 40 ते45 हजारांनी ते निवडून आले. लोकांचं प्रेम असल्यावर काहीही होवू शकतं, असेही ना. अजितदादा म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news