उत्तर महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गिरणारे, वाडगाव, धोंडेगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्या असून, त्यात सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सलग तीन घटनांमुळे बिबट्या नरभक्षक झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

धोंडेगाव परिसरात बुधवारी (दि. 27) रात्री 10 च्या सुमारास बिबट्याने सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सहा वर्षीय गायत्री नवनाथ लिलके (रा. कोचरगाव) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोचरगाव येथील लिलके कुटुंबीय मामाच्या घरी आले होते. जेवणानंतर गायत्री घराबाहेर खेळत असताना शेतातून अचानक बिबट्याने तिच्यावर झडप घातली. स्थानिकांनी रहिवाशांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने शेताच्या दिशेने धूम ठोकली.

बिबट्याचे दात आणि पंजांमुळे झालेल्या जखमांनी गायत्रीच्या शरीरातून अतिरक्तस्राव झाला. त्यामुळे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गायत्रीवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घराशेजारील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. पण, त्यात बिबट्याचा मार्ग शोधण्यात वन विभागाला अपयश आले. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या पसार झाल्याने रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. दरम्यान, वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. मात्र, अधिक वेगवान हालचाली करून पुढील हल्ले रोखण्यासाठी जागृतीसह प्रभावी उपाय करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हल्ल्याच्या घटना
5 एप्रिल : आदिती पागी
(8, रा. वाडगावरोड) जखमी
10 एप्रिल : एकनाथ दाहवड (25, रा. सावरगाव) जखमी
27 एप्रिल : गायत्री लिलके (6, रा. धोंडेगाव) मृत्यू

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT