विदर्भात उष्णतेचा लाटेचा कहर सुरुच; अकोल्यात ४५.४ अंश तापमानाची नोंद | पुढारी

विदर्भात उष्णतेचा लाटेचा कहर सुरुच; अकोल्यात ४५.४ अंश तापमानाची नोंद

वर्धा; पुढारी वृत्तेसवा : विदर्भात उष्णतेचा लाटेचा कहर चालूच आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा नवनवे विक्रम नोंदवित आहे. संपूर्ण विदर्भात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. काही वेळ अंशत: ढगाळ वातावरण राहिले तरीही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गुरुवारी (दि.२८) अकोल्याने सर्वाधिक ४५.४ इतक्या तापमानची नोंद करण्यात आली. तर त्याच्या खालोखाल ब्रह्मपुरी येथे ४५.२ आणि वर्धा येथे ४५.१ इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४२ अंशाच्या वर नोंदविण्यात आले. त्यामुळे सध्या संपूर्ण विदर्भाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे.

विदर्भामध्ये सामान्यत: मे महिन्यामध्ये ४५ अंशाचे तापमान नोंदवले जाते. परंतु यंदा एप्रिलमध्ये तापमानाने ४५ अंशाचा आकडा गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांची चिंता वाढवली आहे. अमरावती ४४.४, बुलडाणा ४२.३, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली ४२.८, गोंदिया ४३.५, नागपूर ४४.३, वाशिम ४३ आणि यवतमाळ जिल्ह्यात ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून विदर्भात सातत्याने विक्रमी उष्णतामानाची नोंद होत आहे. वाढत्या तापमानाने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत अघोषित संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Back to top button