उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सावाना निवडणुकीत ‘ग्रंथालयभूषण’ला कौल, कार्यकारिणी मंडळात ‘इतक्या’ जागांवर विजय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या व्यवस्थापन मंडळाच्या निवडणुकीत ग्रंथालयभूषण पॅनलने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीत बाजी मारतानाच कार्यकारी मंडळ सदस्यपदाच्या 15 पैकी 12 जागांवर ग्रंथालयभूषण पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनलचे केवळ तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

मागील काळात एकत्र काम करणार्‍या संचालक व पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदातून सावानाच्या निवडणुकीत 'ग्रंथालयभूषण' व 'ग्रंथमित्र' या दोन पॅनलमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच कार्यकारिणी मंडळ सदस्य निवडीसाठी सरळ लढत झाली. कार्यकारी मंडळ सदस्यांच्या 15 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. त्यात 12 अपक्षांचा समावेश होता. दरम्यान मतदारांनी अपक्षांना फारसे मनावर घेतले नसल्याचे दिसून आले.

सावानासाठी रविवारी (दि.8) मतदान झाल्यानंतर सोमवारी (दि.9) झालेल्या मतमोजणीत अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्षपदी वैद्य विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे हे ग्रंथालयभूषण पॅनलचे उमेदवार विजयी झाले. यामुळे मंगळवारच्या कार्यकारिणी सदस्य मतमोजणीतही अपेक्षेप्रमाणे ग्रंथालयभूषण पॅनलनेच बाजी मारली. कार्यकारी मंडळ सदस्यांच्या 15 जागांपैकी 12 जागांवर ग्रंथालयभूषणचे उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित तीन जागांवर श्रीकांत बेणी, प्रशांत जुन्नरे व भानुदास शौचे हे ग्रंथमित्रचे उमेदवार विजयी झाले. अत्यंत धिम्या गतीने झालेली ही मतमोजणी मंगळवारी (दि.10) रात्री 11.30 ला संपली. पहिल्या दोन फेर्‍यांमधील कौल पुढच्या दोन फेर्‍यांमध्ये कायम राहिला. सर्व अपक्षांना मिळून 2,410 मते मिळाली. पहिल्या फेरीत आघाडीवर असलेल्या प्रा. शंकर बोर्‍हाडे यांना पुढच्या फेर्‍यांमध्ये पहिल्या 15 मध्ये प्रवेश मिळू शकला नाही. त्यांचा केवळ 50 मतांनी पराभव झाला.

विजयी उमेदवार :
संजय करंजकर (1,986), प्रेरणा बेळे (1,946), जयेश बर्वे (1,863), जयप्रकाश जातेगावकर (1,826), अभिजित बगदे (1,790), देवदत्त जोशी (1,721), सुरेश गायधनी (1,721), धर्माजी बोडके (1,664), गिरीश नातू (1,623), श्रीकांत बेणी (1,515), प्रशांत जुन्नरे (1,561), सोमनाथ मुठाळ (1,594), मंगेश मालपाठक (1,567), उदयकुमार मुंगी (1,546), भानुदास शौचे (1,503).

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT