नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
मानवी जीवनात सुख आणि दुःख हे एखाद्या अतिथीसारखे असून, ते चार दिवसांचे सोबती आहेत. त्यामुळे सुखाने अहंकारी होऊन दुसर्याला कमी लेखू नका आणि दुःखाने भयभीत होऊन आत्महत्येचा मार्गही पत्करू नका. श्रीरामचंद्र आणि सीतामाता इतकेच नव्हे, तर त्यांचे पूर्वज रघुकुलातील राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांच्यावरही प्रचंड संकटे आली. जणू दुःखाचा डोंगरच कोसळला, तरीही ते डगमगले नाहीत. मग तुम्ही-आम्ही छोट्याशा दुःख तथा संकटाला का घाबरतो, असा प्रश्न रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी केला.
सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील श्री तुळजा भवानी मंदिरानजीक उभारलेल्या भव्य डोम-मंडपात श्रीराम कथा निरुपणात ढोक महाराज बोलत होते. याप्रसंगी 'सीता स्वयंवर' प्रसंगावर ते म्हणाले की, श्रीराम आणि सीतामाता हे आदर्श पती-पत्नी असून, त्यांचा आदर्श आजच्या काळात नव्या पिढीने घेण्याची गरज आहे. आज समाजात काय चित्र दिसते? नात्यांमधील प्रेम आणि विश्वास कमी होत आहे, असे सांगून त्यांनी गुरू-शिष्य नात्यातील संबंधही स्पष्ट केले. हार्मोनियमवादक काशीनाथ महाराज पाटील, सहगायक विठोबा महाराज सूर्यवंशी, तबलावादक अश्विनकुमार भकणे व सहगायक रोहिदास महाराज जगदाळे यांनी साथसंगत केली. प्रारंभी रामराव महाराज ढोक आणि मुख्य आयोजक दिनकर पाटील यांच्या हस्ते श्रीराम-सीतामाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज