उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना कोर्टाचा दिलासा, हद्दपारीवर स्थगिती आदेश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ३० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पकडून त्यांना पंधरा दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले होते. या कारवाईच्या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने हद्दपारीच्या कारवाईस स्थगिती दिली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ४) पहाटे शहरातील काही मशिदींसमोर भोंगे लावण्याचा, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तीसहून अधिक मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यापैकी २९ जणांना न्यायालयाने पंधरा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आंदोलनानंतर सर्व वातावरण निवळले असून, प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे, असा युक्तिवाद मनसेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या व हद्दपार केलेल्या सचिन भोसले, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, अमित गांगुर्डे, संतोष कोरडे, निखील सरपोतदार, संजय देवरे यांच्या हद्दपारीस स्थगिती दिली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT