कोल्हापूर : मनपा प्रभाग रचनेची 17 रोजी घोषणा | पुढारी

कोल्हापूर : मनपा प्रभाग रचनेची 17 रोजी घोषणा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे पत्र महापालिका प्रशासनाला मंगळवारी पाठविले. यंदाची महापालिका निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. 92 नगरसेवकांसाठी 31 प्रभाग असतील. दरम्यान, निवडणुकीचा बिगुल कधी वाजणार? याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे. कोल्हापूर शहराच्या लोकसंख्येनुसार 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार्‍या या निवडणुकीत प्रत्येकी 3 नगरसेवकांचा एक याप्रमाणे 30 प्रभाग असतील.

2 नगरसेवकांचा 1 असे एकूण 31 प्रभाग असतील. महापालिका प्रशासनाने त्यासाठीची प्रारूप प्रभाग रचना पूर्ण केली आहे.
फेब—ुवारी 2022 मध्ये महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला होता. त्यावर 115 सूचना व हरकती आल्या होत्या. त्यावर सुनावणी घेऊन 4 मार्च रोजी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल दिला आहे. बहुतांश हरकती एकाच मुद्द्यावर असल्याने त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर मतदारयाद्यांचेही काम सुरू करण्यात आले आहे.
यापूर्वी महापालिकेत एक सदस्य प्रभाग रचनेनुसार सुमारे 6 ते 9 हजार लोकसंख्येचा असे प्रभाग होते. त्यातील मतदारांची संख्या सुमारे पाच हजार होती. आता अंदाजे सहा लाख लोकसंख्या गृहीत धरून 31 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. एका प्रभागातील लोकसंख्या सुमारे 18 ते 20 हजार असणार आहे. त्यातील मतदारांची संख्या सुमारे 15 ते 16 हजार असेल. त्यामुळे इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहोचताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

याच महिन्यात आरक्षण सोडत

पहिलीच निवडणूक आहे, असे समजून प्रभाग रचना व आरक्षण निश्‍चित करावे, असे आदेश निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार प्रशासन लोकसंख्येनुसार आरक्षण निश्‍चित करणार आहे. प्रत्येक प्रभागात आरक्षणासाठी अ, ब, क या क्रमाने अंतर्गत रचना असेल. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एस.सी.) 12 जागा, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एस.टी.) 1 जागा निश्‍चित केल्या जातील. तर उर्वरित 79 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) असतील. तिन्ही प्रवर्गांतील प्रत्येकी 50 टक्के जागांवर महिलांचे आरक्षण असेल.

Back to top button