नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नागपूर येथे सुरू असलेल्या दुसर्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या स्वरा करमरकर हिने 13 वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळविले.
स्वरा ही बिगर-मानांकित खेळाडू असून, तिने उपउपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या सहाव्या मानांकित अन्वी थोरात हिचा 3-0 असा सरळ तीन गेम जिंकून पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या तिसरी मानांकित नैशा रेवास्कर हिचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत 3-2 असा पराभव करून तिने घोडदौड कायम ठेवली. उपांत्य फेरीत तिने जळगावच्या सातव्या मानांकित स्वरदा सानेचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत मात्र स्वराला प्रथम मानांकित टीएसटीटीए मुंबईच्या दिव्यांशी भौमिक हिच्याकडून 4-0 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. स्वरा ही जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, संजय वसंत, संजय कोटेचा, पीयूष चोपडा, राजेश वाणी, यतिन टिपणीस, रामलू पारे, संजय कडू, श्रीकांत अंतुरकर, भय्या गरुड, अजित गालवणकर आदींनी तिचे कौतुक केले.