नााशिक : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी. (छायाचित्र : हेमंत घोरपडे) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिककरांकडून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सरत्या वर्षाला निरोप देताना नवी दिशा, नवी आशा, नवीन संकल्पासह नाशिककरांनी २०२३ या नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरवासीयांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सहकुटुंब थर्टीफर्स्टचा आनंद लुटला. दरम्यान, वर्षातील शेवटच्या दिवशी नागरिकांनी देवदर्शनासाठी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती.

२०२२ मधील अखेरच्या दिवशी सूर्यास्ताच्या साक्षीने गेल्या वर्षभरातील आठवणी मागे सारत नाशिककरांनी नवीन वर्षाचे संकल्प केले. तत्पूर्वी, सकाळपासूनच सर्वत्र थर्टीफर्स्टचा फीव्हर पाहायला मिळाला. शहरातील तपोवन, गंगापूर धरण, सोमेश्वर धबधबा यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात सहकुटुंब आनंद लुटला. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला आतषबाजी करत तसेच नृत्याच्या तालावर ठेका धरत एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी देवदर्शनावरही भर दिला. पंचवटीमधील काळाराम मंदिर, कपालेश्वर भगवान, गंगापूर रोडवरील नवश्या गणपती यासह शहरातील पुरातन तसेच छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. इमारती, सोसायटींमध्येदेखील या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर गावाहून आलेल्या पर्यटकांमुळे गोदाघाट व पंचवटी परिसर फुलून गेला. जिल्ह्यातही नवीन वर्षाचे हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी नववर्ष स्वागताचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील १२ ज्योर्तिलिंगापैकी आद्य ज्योर्तिलिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर, वणीची सप्तशृंगी माता आणि चांदवडची रेणुकादेवी, सिन्नरचे गोंदेश्वरसह अन्य मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली.

सोशल माध्यमातून शुभेच्छा
सोशल माध्यमामध्येही थर्टीफर्स्टचा फीव्हर पाहायला मिळाला. नेटिझन्स‌्नी व्हॉटस्ॲप, फेसबुक, टि्वटर, इन्स्ट्राग्राम यासह अन्य सोशल माध्यमातून एकेमकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. २०२३ वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे व आरोग्यदायी जावो, अशी मनोकामना व्यक्त करत नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT