नाशिक : जिल्हा परिषद शाळेत मानधन तत्त्वावर नियुक्त झालेल्या शिक्षकांना सेवेत कायम होण्याची अपेक्षा असताना त्यांच्या जागेवर नियुक्तीसाठी बिगर आदिवासी भागातील शिक्षक आग्रही आहेत. त्यांना 'पेसा' क्षेत्रात नियुक्ती देण्यात येऊ नये, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे शिक्षकांनी केली.
याबाबत, पेसातील शिक्षक भास्कर जाधव, राजेंद्र पाटील, भगवंत चौधरी, शांताराम पवार, राहुल गवळी, रमेश जाधव, रवी अलबाड, प्रभाकर ठाकरे, योगेश साबळे, रमेश महाले यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची शुक्रवारी (दि.१०) भेट घेत निवेदन दिले. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील ३११ शिक्षकांना जिल्हा परिषद शाळेत मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली. त्यापैकी अवघे ५० शिक्षक सेवेत दाखल झाल्यामुळे २६१ जागा रिक्त राहिल्या.
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना १ सप्टेंबर २०२५ रोजी या ठिकाणी मानधनावर नियुक्ती पत्र देण्यात आले. सेवेत रुजू न झालेले शिक्षक हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बिगर आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्त झाले आहेत. घरापासून दूर जावे लागल्याने या शिक्षकांना आता पुन्हा मानधन तत्त्वावरील नियुक्ती हवी आहे. त्यामुळे या शिक्षकांची नोकरी धोक्यात येऊ शकते. मुळात एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा 'टीईटी' परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्यानंतरच शिक्षक म्हणून शासकीय सेवेत दाखल होता येते. या सर्व शासन निर्णयांचा विचार करुन त्या शिक्षकांबद्दल निर्णय घेण्याची मागणी शिक्षकांनी केली.