Zilla Parishad Nashik : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कक्ष स्थापन
नाशिक : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हास्तरीय अभियान कक्षाची स्थापना केली आहे. या अभियान कक्षामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांवर समन्वय वाढणार आहे. कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायतींच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या अभियानात जिल्हा परिषद आघाडीवर राहण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील आहे, याचाच एक भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १ हजार ३८७ ग्रामपंचायतींना सातही घटकांच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन, समन्वय व तांत्रिक सहाय्य मिळणार आहे.
अभियान कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीचा प्रगती अहवाल दर पंधरवड्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. यासाठी जि. प.ने वस्तुनिष्ठ अहवाल प्रणाली विकसित तयार केली असून, तिच्या माध्यमातून एका क्लिकवर सर्व ग्रामपंचायती आणि १५ पंचायत समित्यांची प्रगती पाहता येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेत वाढ होणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदने यापूर्वीच विभागप्रमुखांची तालुका पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे पालक अधिकारी संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन निर्देशांकानुसार अभियानाच्या प्रगतीसाठी आढावा घेणार आहेत.

