ठळक मुद्दे
जिल्हा परिषदेच्या तिघा खातेप्रमुखांविरोधात महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी
जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रताप पाटील गत आठवड्यात परस्पर रुजू झाले, पुन्हा रजेवर गेले
जिल्हा महिला बालविकास अधिकारी पाटील यांच्याही तक्रारी असल्याचे खुद्द प्रशासनाने सांगितले होते
नाशिक : जिल्हा परिषदेच्या तिघा खातेप्रमुखांविरोधात महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींवरून चौकशी फेऱ्यात सापडलेले जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रताप पाटील गत आठवड्यात परस्पर रुजू झाले खरे. मात्र, पाटील हे सोमवार (दि.11)पासून पुन्हा रजेवर गेले असून, 17 ऑगस्टपर्यंत ते वैद्यकीय रजेवर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे पाटील यांची विशाखा समितीकडून चौकशी पूर्ण झाली आहे की नाही, त्यांचा अहवाल सादर झाला की नाही याबाबत कोणतेही माहिती पुढे आलेले नाही. यातच ते सतत रजेवर जात असल्याने पाटील यांच्याबाबत संभ्रम वाढला आहे.
महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे प्रकरण थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात पोहोचले होते. यात, एक अधिकारी निलंबित, तर दुसऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. यात जिल्हा महिला बालविकास अधिकारी पाटील यांच्याही तक्रारी असल्याचे खुद्द प्रशासनाने सांगितले होते. तक्रारी प्रकरणी सुरुवातीस पाटील चार दिवस रजेवर गेले होते.
त्यानंतर, पाटील 21 जुलै रोजी रुजू झाले. मात्र, 22 जुलैपासून ते पुन्हा रजेवर गेले होते. या कालावधीत त्यांचा पदभार जिल्हा महिला बालविकास अधिकारी (राज्य) सुनील दुसाणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. रजेच्या कालावधीत पाटील यांनी जिल्हा परिषदेत येऊन विशाखा समितीसमोर हजेरी लावली. यात त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. याच दरम्यान, 30 जुलै रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची बदली झाली.
आशिमा मित्तल यांची बदली झाल्यानंतर लागलीच पाटील हे गत आठवड्यात 4 ऑगस्ट रोजी रुजू झाले. रुजू होताना त्यांनी सामान्य प्रशासन व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल देणे आवश्यक होते. परंतु, ते परस्पर रुजू झाले. यातही रुजू झाल्यानंतर ते कार्यालयात न बसता बाहेर फायली मागवून कामकाज करत होते. असे असतानाच, पाटील सोमवारपासून पुन्हा रजेवर गेले आहेत. एका बाजूला विशाखा समितीकडून चौकशीबाबत स्पष्टता नाही. त्यांच्या चौकशीचा अहवालदेखील सादर झालेला नाही. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात असताना पाटील रजेवर जात असल्याने कर्मचारीवर्गात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.