नाशिक : जिल्हा परिषदेतील बहुचर्चीत विभागप्रमुखांकडून झालेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक व मानसिक छळ प्रकरणी आता राज्य महिला आयोगाने पोलिसांना चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य महिला आयोगाने पोलिसांना चौकशीचे करण्याचे आदेशानुसार पोलिसांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठविले असून विशाखा समितीच्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे समितीच्या आहवालात काय दडले याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक व मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारी झाल्याने विशाखा समितीने या प्रकरणांची कसुन चौकशी केली. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. त्यानंतर एक अधिकारी निलंबित आहे. तर दोन अधिकारी रजेवर गेले असून त्यांची चौकशी पूर्ण झालेली नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवून या प्रकरणाची माहिती मागवली आहे. ग्रामीणच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १५ जुलै रोजी पत्र पाठवून अहवाल मागविला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेकडे महिला कर्मचाऱ्यांनी कुठे तक्रार केली किंवा गुन्हा दाखल केला आहे का? याबाबत आदींबाबत अहवाल मागविला आहे. त्या अहवालाच्या आधारे पोलिस अधिक तपास करुन त्यांचा अहवाल महिला आयोगासमोर सादर करणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या आहवालाकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेतच अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर सदर प्रकरण राज्यभराच चर्चेत आले आहे. याबाबत विशाखा समितीने चौकशी केली आहे. आता पोलिसांनी जिल्हा परिषदेकडून आहवाल मागवत चौकशी सुरू केली आहे. याबाबत पोलिसांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष येऊन माहिती घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसत आहे.