नाशिक जिल्हा परिषद / Nashik Zilla Parishad Pudhari News Network
नाशिक

Zilla Parishad Nashik | गट, गणासंदर्भात प्राप्त हरकतींवर गुरुवारी सुनावणी

हरकतदारांना उपस्थित राहणे बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट, गण प्रारूप आराखड्यावर प्राप्त झालेल्या 60 हरकतींवर गुरुवारी (दि.7) सुनावणी होणार आहे. हरकत घेणार्‍या हरकतदारांना सुनावणीच्यावेळी उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. गट, गण प्रारुप आराखड्यावर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधून 63 हरकती सोमवारअखेरपर्यंत (दि.28) दाखल करण्यात आल्या. या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर तेथील प्रभाग रचना अंतिम होणार आहे.

जिल्हा परीषद, पंचायत समितीसाठी नव्याने गट, गण आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर निर्धारित कालावधीत जिल्ह्यातून एकूण 60 हरकती प्राप्त झाल्या होत्या. सर्वाधिक हरकती निफाड तालुक्यात 18, त्याखालोखाल नाशिक तालुक्यात 14, मालेगाव 12, चांदवड 4, देवळा 3, नांदगाव आणि सिन्नर प्रत्येकी 2, तर त्र्यंबक, येवला, पेठ, सुरगाणा आणि कळवण येथून प्रत्येकी एक हरकत नोंदवण्यात आली. इगतपुरी, दिंडोरी आणि बागलाण या तालुक्यांतून कोणतीही हरकत प्राप्त झालेली नव्हती.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढल्याने त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले, तर तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याठिकाणी याद्या लावून हरकती मागविण्यात आल्या होत्या. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्या हरकती अभिप्रायासह विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यावर गुरूवारी (दि. 7) ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून हरकती निकाली काढल्यानंतर गट-गण रचनेचे अंतिम प्रारूप 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT