नाशिक : सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम गट-गण रचना शुक्रवारी (दि. 22) अखेर जाहीर झाली. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आराखड्यातील मालेगाव, नाशिक, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गट, गणात किरकोळ दुरुस्त्या करण्यात आल्याने बदल झाला आहे. काही गावे, ग्रामपंचायत गटातून वगळत इतर गट, गणात समावेश केला आहे. उर्वरित दहा तालुक्यातील गट, गणात कोणताही बदल झालेला नाही. अंतिम रचना प्रसिध्द झाल्यानंतर आता गट, गण आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी नव्याने गट, गण आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर निर्धारित कालावधीत जिल्ह्यातून एकूण ६४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. सर्वाधिक हरकती निफाड तालुक्यात १८, त्याखालोखाल नाशिक तालुक्यात १४, मालेगावला १२, चांदवडला चार, देवळा तीन, नांदगाव आणि सिन्नर प्रत्येकी दोन, तर त्र्यंबक, येवला, पेठ, सुरगाणा आणि कळवण येथे प्रत्येकी एक हरकत नोंदविली होती. इगतपुरी, दिंडोरी आणि बागलाण या तालुक्यांतून कोणतीही हरकत प्राप्त झाली नव्हती. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्या हरकती अभिप्रायासह विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यावर 11 आॅगस्टपर्यंत सुनावणी घेऊन हरकती निकाली काढल्या. यात 42 हरकती फेटाळण्यात आल्या तर, पाच मान्य तर, 17 हरकती अशंत: मान्य करण्यात आल्या.
मालेगाव तालुक्यात समावेश करण्यात आलेल्या गाव, वाड्यांवर सर्वाधिक हरकती होत्या. यातील पाच हरकती मान्य तर, पाच अशंतः मान्य केल्याने तालुक्यातील खाकुर्डी, झोडगे, कळवाडी, साकुरी नि., दाभाडी व रावळगाव या गट यातील गणात अशंत बदल झाले आहे. काही गावे ही इतर गटाला जोडण्यात आली आहे. नाशिक तालुक्यात प्राप्त झालेल्या 8 हरकती अशंत: मान्य केल्या आहे. त्यामुळे तालुक्यातील चारही गट, गणात अशंत: बदल झाले आहे. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ तालुक्यात सिमा निश्चितीच्या हरकती होत्या. त्या हरकती मान्य झाल्याने काही गावे जवळील गटात गेली आहे. त्यामुळे गट , गण यातील गावे कमी जास्त झाली आहेत. हे अंतिम झालेले गट, गण रचना प्रसिध्द करण्याचे अधिकारी विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याने शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी शासन राजपत्रात प्रसिध्द केली आहे.
चांदवड, निफाड, येवला, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, देवळा व कळवण तालुक्यातून प्राप्त झालेल्या हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दहा तालुक्यातील गट, गण कोणतेही बदल झालेले नाही. प्रसिध्द करण्यात आलेले गट, गण जैसे थे आहेत.
गट, गण रचना अंतिम झाल्याने आता आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. गट, गणाचे आरक्षण कसे पडते यावर इच्छुकांच्या निवडणुकांचे भवितव्य असणार आहे. अंतिम रचना झाल्यानंतर साधारण पुढील महिन्यात आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे.