

नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागाने राबविलेल्या बदली प्रक्रियेवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने आक्षेप घेत, चुकीच्या बदल्या झाल्याचा आरोप केला आहे. समुपदेशनवेळी 'पेसा'त 19 व बिगर आदिवासी क्षेत्रात 16 बदल्या झाल्याचे विभागप्रमुखांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र, 'पेसा'चे 24 तर, बिगर आदिवासीत 21 बदल्यांचे आदेश निर्गमित झाल्याची तक्रार महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांनी केली आहे.
चिलबुले यांनी बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे तक्रारपत्र अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांना दिले आहे. शासन आदेशानुसार आदिवासी भागातील जागा भरणे बंधनकारक असतानाही 32 जागा रिक्त ठेवल्या गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे. समुपदेशन प्रक्रियेत पेसा क्षेत्रातील 19 व आदिवासी भागातील 16 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष 21 मे रोजीच्या आदेशांनुसार ‘पेसा’त 24 तर बिदर आदिवासी भागात 21 बदल्या झाल्याचे दिसून आले आहे. समुपदेशन प्रक्रियेनंतर 10 अतिरिक्त विनंती बदल्या झाल्या असून यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप महासंघाने केला आहे. त्यासाठी 15 मे रोजी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या पार पडलेल्या बदली प्रक्रियेची चित्रफित तपासण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
बिगर आदिवासी : संजय बाविस्कर (लासलगाव, निफाड), समाधान पाटील (वंजारवाडी, नाशिक), सुभाष गवई (अनकुटे येवला), रूपाली मैलागीर (लोणारवाडी सिन्नर), लिंगराज जंगम (धोंडेगाव, नाशिक)
पेसा क्षेत्र : रूपाली महाले (आड बुद्रूक, पेठ), संजय वाबळे (आंबेवनी, दिंडोरी), सोनाली पगारे (पळसे, नाशिक), माधुरी पाटील (सोनगिरी, सिन्नर), योगिता पुंड (मोहगाव, नाशिक)
सुनावणीत विभागप्रमुख मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सांगण्यावरुन बदलीप्रक्रिया राबविल्याचे सांगत आहेत. या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे, याची चौकशी होईल. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. चौकशीत न्याय न मिळाल्यास शासनाकडे जाणार. प्रसंगी आंदोलन करू.
उमेशचंद्र चिलबुले, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघ
तक्रार प्राप्त झाली असून ग्रामपंचायत बदल्यांबाबत सुनावणी घेतली आहे. यात संघटनेचे व विभागाचे म्हणणे एकूण घेतले आहे. त्याबाबतचा अहवाल सादर करणार आहे.
डाॅ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद