नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांमधील झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले खरे; मात्र प्रत्यक्षात नेमक्या काय दुरुस्त्या अन् कशा करायच्या, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. दुसरीकडे बदली झाल्याने कार्यमुक्त होऊन बदली ठिकाणी हजर व्हायचे की नाही या द्विधा मनःस्थितीत कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे बदल्यांबाबत साराच संभ्रम तयार झाला आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्यांमध्ये अनियमितपणा होऊन अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप कर्मचारी संवर्गातील विविध संघटनांनी केला होता. या अन्यायकारक बदल्या रद्द करण्यासाठी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. या बदल्यांविरोधात संघटनांनी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्याकडे धाव घेतली, तर ग्रामसेवक संघटनेनेही औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. या तक्रारींची गंभीर देखल घेत डॉ. गेडाम यांनी बदल्यांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केली होती. या समितीने गत आठवड्यात जिल्हा परिषदेत येत दिवसभर तळ ठोकत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी समितीकडे लेखी तक्रारीदेखील केल्या होत्या. चौकशीअंती समितीने शुक्रवारी सायंकाळी उशिरा अहवाल डॉ. गेडाम यांच्याकडे सादर केला होता.
गेडाम यांनी बदल्यांमधील त्रुटी दूर करण्याचे आदेश प्रशासनाला देत दुरुस्त्या करण्याबाबत सूचना केल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात नेमक्या काय दुरुस्ती करायची, कशी दुरुस्ती करायची याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे दुरुस्त्या तरी काय करायच्या या संभ्रमात प्रशासन आहे. 10 टक्के प्रशासकीय बदल्यांचे आदेश असताना 15 टक्के बदल्या झाल्या आहेत. दुरुस्ती करावयाची झाल्यास 5 टक्के रद्द कराव्या लागतील. रद्द केल्यास बदली करून त्या ठिकाणी पदस्थापना दिलेल्या कर्मचाऱ्यांस कोठे व कशी पदस्थापना द्यायची, अशा संभ्रमात प्रशासन अडकले आहे. दुरुस्त्या करायच्या तर, चुका झाल्या आहे हे सिद्ध होते. ज्यांनी चुका केल्या त्यांनीच पुन्हा दुरुस्त्या कशा करायच्या हाही प्रश्न उपस्थित होत आहे. दुसऱ्या बाजूला बदलीपात्र कर्मचाऱ्यांना 31 मे रोजी कार्यमुक्त करायचे आहे. प्रशासनाने तशी कार्यवाही तोंडी सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कार्यमुक्त होऊन हजर व्हायचे की, बदल्या रद्द होण्याची वाट बघायची, असे प्रश्न कर्मचारी वर्गाला सतावत आहे.
अनियमित बदल्यांची तक्रार ही विविध संवर्गातील कर्मचारी संघटनांनी केली होती. त्या तक्रारींवर विभागीय आयुक्त डाॅ. गेडाम यांनी चौकशी समिती नियुक्त करत चौकशी केली तसेच दुरुस्त्या करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. परंतु, कर्मचारी संघटनांना याबाबत काहीही कळविले नाही. जि. प. प्रशासनाकडूनदेखील संघटनांना काहीही कळविले जात नसल्याने संघटना पदाधिकारी हताश झाले आहेत. बदल्यांबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न संघटनांकडून उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल सोमवारी (दि. 2) रुजू होत आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन पुढील निर्णय संघटना घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.