नाशिक : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीची गण-गण रचना जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रसिध्द झालेल्या गट रचनेनुसार जिल्ह्यात कायम राजकीय वर्चस्व असलेल्या निफाड तालुक्याचे वर्चस्व राजकीयदृष्ट्या कमी झाले आहे. या तालुक्यात दोन गट घटले असून, आता आठ गट झाले आहेत. मालेगावमध्ये एका गट वाढल्याने या दोन तालुक्यांतून जिल्हा परिषदेत राजकीय वर्चस्वासाठी लढाई असणार आहे.
जिल्हा परिषदेची गत निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. त्यावेळी एकूण ७३ गट तर, 146 गण अस्तित्त्वात होते. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करतांना कायमच तालुका अन गट यांचा प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे सत्ता समीकरणात तालुका प्रातं याचा विचार प्राधान्याने होत आला आहे. यातही गट आरक्षण फिरते असले तरी, काही प्रांत, तालुके यांचा प्रभाव सत्तेत कायम राहिलेला दिसतो. आतापर्यंत निफाड तालुक्यातून सर्वाधिक 10 गट असल्याने सत्ता स्थापनेत कायमच निफाडचे वर्चस्व दिसून येत होते. यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष असो की, सभापती या पदात कायम निफाडला संधी मिळत राहिल्याने तालुक्याचा वरचष्मा असायचा. मात्र, नव्याने झालेल्या गट रचनेत तालुक्यातील दोन गट कमी झाले असून गटाची संख्या ही 8 वर आली आहे. दुसरीकड़े मालेगाव तालुक्यात एक गट वाढला असून तालुक्यातील गटाची संख्या ही 8 झाली आहे. त्यामुळे आता निफाड व मालेगाव तालुका गटाच्या बाबतीत सम-समान झाले आहे. परिणामी सत्ता स्थापनेत दोन्ही तालुक्यांचे राजकीय वर्चस्व राहणार आहे.
सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडूण येणे अपेक्षित आहे. तसेच मंत्री व नेत्यांना जिल्ह्यात वर्चस्व ठेवण्यासाठी जास्त सदस्य निवडून आणावे लागतात. यात आता मालेगाव तालुक्यात आठ गट निर्माण झाल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी शिवसेनेचे सदस्य निवडून आणावे लागतील. निफाड तालुक्यातून आमदार दिलीप बनकर यांना आपले पक्षाचे सदस्य निवडून आणावे लागणार आहे. आमदार स्वत:च्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संधी देतात. सत्ता स्थापन करताना अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सभापती देवून त्यांची राजकीय सोय करतात.