

ओरोस : आगामी जि. प. व पं. स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकती, सूचना किंवा म्हणणे मांडावयाचे असल्यास मतदारांनी 21 जुलैपर्यंत त्या लेखी स्वरूपात संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकार्यांकडे मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 50, तर पंचायत समितीचे 100 गण आहेत. मतदारसंघात काही बदल झाले असल्यास त्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम 1961 अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा परिषद मतदारसंघ गट व पंचायत समित्या निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या 14जुलै च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाच्या फलकावर तसेच तहसीलदार वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर व पंचायत समिती वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग येथील फलकावर लावण्यात आली आहे.
या प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना संबधित तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे 21 जुलै पर्यंत सादर करावीत. या तारखेनंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, विचारात घेतली जाणार नाहीत, असे जिल्हाधिर्यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील (वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग) व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकावर हा मसुदा लावण्यात आला आहे.
हरकती किंवा सूचना सकारण लेखी स्वरूपात संबंधित तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्या लागतील.
हरकती नोंदवण्यासाठी 21 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.