

नाशिक : गत साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या गट- गण रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी (दि. १४) प्रसिध्द झाला. यात जिल्हा परिषदेत एक गट व दोन गण वाढल्याने गटांची संख्या 74 तर गणांची संख्याही 148 झाली आहे. निफाड तालुक्यात दोन गट कमी झालेले असताना सुरगाणा, मालेगाव व चांदवड तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे. प्रसिध्द झालेल्या आराखड्यावर येत्या २१ जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. हरकती व अंतिम सूचनेवर निर्णय घेऊन १८ ऑगस्टपर्यंत गट-गण रचना अंतिम करून मान्यतेसाठी शासनाकडे पाठविली जाईल, या मान्यतेनंतर साधारण गट व गणांचे आरक्षण कार्यक्रम जाहीर होईल.
जिल्हा परिषदेच्या 74 गट आणि 15 पंचायत समित्यांच्या 148 गणांची सन 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून गट-गण रचना करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांच्या नेतृत्वाखालील तालुकास्तरीय समितीने गट-गण रचनेचे आराखडे मागविले होते. गत आठवड्यात तालुका स्तरावरून हे आराखडे यांची प्राथमिक तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. गट व गणांचे क्रमांक, त्यांची लोकसंख्या नकाशाची दिशा योग्य पध्दतीने फिरते आहे का? अशा विविध बाबींची तपासणी कार्यालयाकडून झाली. जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर, गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी प्रसिध्द करण्यात आला. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या ठिकाणी याद्या लावण्यात आल्या आहेत.
सन 2022 मध्ये तयार गट -गणांची प्रभाग रचना ही ११ तालुक्यांत कायम ठेवण्यात आली आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. तीन तालुक्यांमध्ये बदल झाला आहे. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढल्याने त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. आता मालेगावमध्ये 8, सुरगाण्यात 4 व चांदवडमध्ये 5 गट झाले आहे. निफाड तालुक्यात दोन गट कमी झाले आहेत. त्यामुळे येथे पिंपळगाव गटातील अंतरवेल, मुखेड ही गावे पालखेड गटाला, बेहेड, नारायण टेंभी, उंबरेखड ही गावे सुकेणे गटाला तर, पालखेड गटातील कुंदेवाडी गाव उगाव गटात, सुकेणे गटातील नारायणगाव चांदोरी गटाला जोडण्यात आले आहे.
मालेगामध्ये साकुरी निंबायत, सुरगाण्यात हतगड व चांदवडमध्ये धोडंबे हे नवीन गट अस्तित्वात आले आहे. याशिवाय 10 गटांचे नावे बदलण्यात आली आहेत. यात बागलाणमधील पठावे दिगर गट मानूर, मालेगावमधील वडनेर गट खाकुर्डे, देवळामधील वाखारी गट खर्डे (वा) कळवणमधील खर्डे दिगर पुनदनगर, सुरगाण्यातील भावडा गट श्रीभवन, पेठ तालुक्यातील धोंडमाळ गट आंबे, निफाडमधील देवगाव गट नांदूरमध्यमेश्वर, इगतपुरीतील शिरसाठे गट खंबाळे, खेड गट धामणगाव तर, सिन्नरमधील नायगाव गट माळेगाव झाला आहे.
१४ जुलैला प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द
२१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करणे
२८ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणे
११ ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेणे
निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत १८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करणे
असे आहेत तालुकानिहाय गट
बागलाण (मानूर, ताहाराबाद, जायखेडा, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव)
मालेगाव (खाकुर्डी, झोडगे, कळवाडी, साकुरी निं, दाभाडी, रावळगाव, सौंदाणे, निमगाव)
देवळा (लोहोणेर, उमराणे, खर्डे (बा)
कळवण (पुनदनगर, मानूर, कनाशी, अभोणा)
पेठ (आंबे व कोहोरे)
सुरगाणा (उंबरठाण, श्रीभुवन, ठाणगाव, हतगड)
दिंडोरी (अहिवंतवाडी, कसबेवणी, खेडगाव, कोचरगाव, उमराळे बु, मोहाडी)
चांदवड (धोडंबे, दुगाव, वडनेर भैरव, वडाळीभोई, तळेगावरोही)
नांदगाव (साकोरा, न्यायडोंगरी, भालूर, जातेगाव)
येवला (पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल, मुखेड)
निफाड (पालखेड, लासलगाव, विंचूर, उगाव, कसबे सुकेणे, चांदोरी, सायखेडा, नांदूरमध्यमेश्वर)
नाशिक (गिरणारे, पळसे, एकलहरे, विल्होळी)
त्र्यंबकेश्वर (ठाणापाडा, हरसूल, अंजनेरी)
इगतपुरी (खंबाळे, वाडीव-हे, घोटी बु, नांदगाव सदो, धामणगाव)
सिन्नर (माळेगाव, मुसळगाव, सोमठाणे, नांदुरशिंगोटे, दापूर, ठाणगाव