award 
नाशिक

YCMOU Yash Jeevangaurav Puraskar | मुक्त विद्यापीठाचे 'यश जीवनगौरव' पुरस्कार जाहीर

YCMOU Yash Jeevangaurav Puraskar | 1 जुलै रोजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी होणार सन्मान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रांत समाजोपयोगी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या 'यश जीवनगौरव पुरस्कार-२०२६' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्षे असून, विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार (दि. १ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात विशेष समारंभात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

समाजहितासाठी दीर्घकाळ मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. यावर्षी विविध क्षेत्रांतील कार्याचा सखोल आढावा घेऊन पाच मान्यवरांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यामध्ये डॉ. अशोकराव कुकडे (लातूर) यांची वैद्यकीय सेवा, अनिल मेहेर (नारायणगाव) यांची कृषी व ग्रामीण विकास, प्रा. दिलीप फडके (नाशिक) यांची साहित्य, संस्कृती व ग्राहक संरक्षण, डॉ. निरुपमा देशपांडे (मेळघाट, अमरावती) यांची आदिवासी उद्योजकता व पर्यावरण तसेच सीमा मिलिंद कांबळे (पुणे) यांची महिला उद्योग सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी 'यश जीवन गौरव पुरस्कार-२०२६' साठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कारार्थीच्या निवडीची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि 'यश जीवन गौरव पुरस्कार' सल्लागार व शिफारस समितीचे सदस्य सचिव डॉ. मधुकर शेवाळे यांनी दिली. यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, मुक्त विद्यापीठ हे केवळ शिक्षण देणारे विद्यापीठ नसून समाजाशी नाते जोडणारी ज्ञानसंस्था आहे.

विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा देणे हा यश जीवनगौरव पुरस्काराचा मूलभूत हेतू आहे. अशा व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे सकारात्मक मूल्यांचा गौरव असून, भविष्यातही विद्यापीठ समाजपरिवर्तनाला प्रेरणा देणारे उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT