'बीएण्ड बी'(बेड ॲण्ड ब्रेड्-बटर) अर्थात न्याहारी-निवास योजना Pudhari News Network
नाशिक

World Tourism Day: 'न्याहरी- निवास' योजनेला मिळावी नव'संजीवनी'

आज जागतिक पर्यटन दिन : नाशिक विभागात केवळ २०४ 'बीएण्ड बी' सेवाच सक्रिय

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • ममदापूर, भिवतास, नांदूर-मध्यमेश्वरला 'निवास-न्याहारी' योजनांची प्रतीक्षा

  • पर्यटन व्यवसायाला नाशिकमध्ये विपूल वाव

  • नाशिक येथील गड किल्ल्यांवर 'निवास-न्याहारी' योजना यशस्वी केल्यास पर्यटकांना उत्तम सेवा

नाशिक : पर्यटन विभागाची 'निवास-न्याहारी' योजना नाशिकमध्ये रुजलीच नाही. वास्तविक, नाशिकमधील निसर्ग, पावसाळ आणि वन्यजीव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदूर-मध्यमेश्वर, ममदापूर आणि पेठ, सुरगाणा तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणांवर ही योजना स्थानिकांनी अधिक प्रभावीपणे राबवल्यास नाशिकची पर्यटन वृद्धी जलद आणि सहज शक्य आहे, असे मत पर्यटक अभ्यासकांनी नोंदवले.

पर्यटन हा उत्तम पर्याय आणि जीवनशैली होत असताना शासनाच्या काही चांगल्या योजना सपशल अपयशी ठरत आहेत. देशात पर्यटनात आघाडीवर असलेल्या केरळ राज्यासह महाराष्ट्राचा कॅलिफॉर्निया म्हटल्या जाणाऱ्या कोकणात 'बीएण्ड बी'(बेड ॲण्ड ब्रेड्-बटर) अर्थात न्याहारी-निवास योजना त्यातील एक! नाशिक विभागात सर्वाधिक गड किल्ले, निसर्गरम्य ठिकाणे, पावसाळी पर्यटन आणि पक्षी-प्राण्याचे वन्यजीव पर्यटनाचे विपूल पर्याय असतानाही विभागात केवळ २०४ सक्रिय केंद्रे आहेत. 'बी ॲण्ड बी' योजनेला नागरिक, स्थानिकांनी अल्प प्रतिसाद का लाभतोय याची अभ्यासकांनी विविध कारणमिमांसा केली असता वास्तव समाेर येत आहे.

पक्षी तीर्थ नांदूर-मध्यमेश्वर, काळवीटांचे माहेरघर ममदापूर आणि पेठ-सुरगाणा तालुक्यातील बिलकस व्हॅली धबधबा, बाऱ्हे गावाजवळील भिवतास आणि अन्य स्थळांजवळ ही याेजना यशस्वी झाल्यास नाशिक पर्यटनवृद्धी शक्य आहे, असे मत पर्यटक अभ्यासकांनी नोंदवले. महाराष्ट्रात सर्वाधिक गड-किल्ले नाशिक आणि आसपास आहेत. 'साल्हेर-सालोटा' किल्लांचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीतही नुकताच झाला आहे. या गडावर आरोहन करुन भ्रमंती करण्यास एक संपूर्ण दिवस लागतो. येथे निवास-न्याहरी योजना स्थानिकांनी यशस्वी केल्यास पर्यटकांना उत्तम सेवा मिळतील. यासह नाशिकजवळ असे अनेक ठिकाणे आहेत जिथे जेवण-राहण्याच्या सुविधा नाहीत. त्यासाठी स्थानिकांनी योजनेच्या अटी, शर्तीनुसार पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नियमित केले जाते, मात्र, गरज असूनही प्रतिसाद मिळत असूनही ही योजना नाशिक विभागात संपूर्णपणे फसली असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्ये निवास, न्याहारी योजनेसाठी व्यापक वाव, संधी आहे. नांदूर-मध्यमेश्वर, ममदापूरसह नाशिकमध्ये अनेक ठिकाणी आहेत जिथे राहण्या-जेवण्याची सोयच नाही. हॉटेल्स उपहारगृहे देखील दूर आहेत किंवा नाहीच. अशा ठिकाणी 'बीएण्ड बी' योजना सुरु केल्यास निश्चितच कोकणातील पर्यटनासारखे नाशिक पर्यटनाला बहर येईल. या जागेचा उपयोग 'अॉफ सिजन'ला वाढदिवस, साखरपुडा आदी मंगल कार्यासाठी देऊन सेवाकर्त्याला वर्षभर उत्पन्नही सुरु राहिल,
दत्ता भालेराव, पर्यटन अभ्यासक.
या याेजनेतून स्थानिकांना रोजगार मिळावा व पर्यटनाला\ चालना मिळावी, हा उद्देश आहे. कोकण-केरळात यशस्वी झालेली ही योजना बऱ्याच ठिकाणी अयशस्वी झाली. सेवा प्रदान कर्त्याला हॉटेल्स सारखे परमिट वगैरे काढावे लागत नाही की जीएसटी भरण्याचीही यात गरज नसते. पर्यटक अशा 'स्टे होम' पेक्षा हॉटेलमध्ये राहणे पसंत करतात. त्याच्यात ही योजनाच रुजली, पचली नाही. योजनेस जोरकस प्रसिद्धी-प्रचाराची गरज आहे.
कॅप्टन नीलेश गायकवाड, पर्यटन अभ्यासक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT