

प्रा. रणजित तोडकर
जागतिक पर्यटन दिन म्हणून 27 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मानवी संस्कृतीचा आणि राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या एका विराट क्षेत्राचा उत्सवच आहे, असे म्हणता येईल. संयुक्त राष्ट्राने या वर्षासाठी दिलेली ‘पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन’ ही संकल्पना, या क्षेत्राच्या भविष्याची दिशा आणि त्याची गहनता अधोरेखित करते.
पर्यटनाच्या माध्यमातून वैश्विक सलोखा, आर्थिक सुबत्ता आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या सामूहिक संकल्पाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. पर्यटनाची व्याख्या केवळ मनोरंजनापुरती मर्यादित ठेवल्यास ते हिमनगाच्या टोकाकडे पाहून त्याच्या विशालतेचा अंदाज लावण्यासारखे होईल. पर्यटन हे एक शक्तिशाली आर्थिक इंजिन आहे, जे आज जगातील प्रत्येक 10 व्यक्तींपैकी एकाला रोजगार पुरविते. जगभरातील कोरोना महामारीच्या प्रलयंकारी तडाख्यातून सावरल्यानंतर या क्षेत्राने फिनिक्स पक्षाप्रमाणे जी भरारी घेतली आहे, ती अचंबित करणारी आहे. जागतिक स्तरावर पर्यटन महामारी पूर्वपातळीच्या तब्बल 98 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. भारतासाठी पर्यटन हे केवळ परकीय चलन मिळवण्याचे साधन राहिले नसून सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राला साकार करण्याची प्रचंड क्षमता या क्षेत्रात दडलेली आहे. आकडेवारी पाहिली असता हे चित्र अधिक स्पष्ट होते. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या अहवालानुसार, 2024 मध्ये पर्यटन क्षेत्राचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) योगदान हे 21 लाख कोटींच्या पुढे गेले आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेच्या 6.6 टक्के इतके आहे. यामुळेच भारत जगातील सर्वाधिक 10 पर्यटन अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला. या क्षेत्रात सुमारे 4.6 कोटी इतकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली आहे. या आकडेवारीवरून कोट्यवधी कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्याची आणि त्यांच्या उदरनिर्वाह साधनांची कल्पना येईल.
आज भारतातील पर्यटनाचा विकास हा महानगरानपुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘स्वदेश दर्शन’ आणि ‘प्रसाद’ यांसारख्या सरकारी योजनांमुळे हिमालयातील दुर्गम खेड्यांपासून ते समुद्रातील बेटांपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे विणले जातेय. यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. पर्यटकांमुळे छोट्या गावांमध्ये होम स्टे, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि हस्तकला विक्री केंद्रे उभी राहत आहेत, ज्यामुळे विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचतेय. विशेषतः हा यामध्ये भारतातील देशांतर्गत पर्यटकांची भूमिका खूप मोठी राहिली आहे.
2024 मध्ये भारतीय नागरिकांनी देशांतर्गत पर्यटनावर सुमारे 15.5 लाख कोटी खर्च केले होते, यावरून या क्षेत्राची भव्यता आणि व्याप्ती लक्षात येईल. ‘देखो अपना देश’ यासारख्या उपक्रमांमुळे भारतीयांना समृद्ध वारसा अनुभवण्याची प्रेरणा तर मिळतेच, शिवाय यामधून स्थानिक अर्थव्यवस्थांना वर्षभर चालना मिळत आहे. थोडक्यात, पर्यटन हे भारताच्या विकासाच्या इंजिनातील एक महत्त्वाचे चाक बनले आहे. ‘पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन’ ही संकल्पना एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देते. पर्यटनाची वाढ ही अनियंत्रित आणि विनाशी असू नये. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर येणारा ताण, स्थानिक संस्कृतीचे होणारे खच्चीकरण आणि पर्यावरणाचा र्हास या धोक्यांकडे डोळेझाक करून चालणार नाही. यासाठी धोरणकर्त्यांपासून ते सामान्य पर्यटकांपर्यंत प्रत्येकाने भूमिका बजावणे आवश्यक आहे.