नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या स्वागतासाठी २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामूहिक शंखनाद, ग्रामपरिक्रम, शोभायात्रा, ध्वजारोहण आणि गोदावरी महाआरती हे कार्यक्रम या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार असून, रविवारी (दि. २५) दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अभिजीत मुहूर्तावर रामकुंड, कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहण होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि. २५) गोदाघाटावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार मैदानावर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ५०१ शंखांचा विश्वविक्रमी सामूहिक निनाद करण्यात येणार आहे. अनंत विजय शंखनाद ग्रुपच्या सहकार्याने होणाऱ्या या उपक्रमातून ३०३ शंखांच्या पूर्वीच्या विक्रमाला मागे टाकले जाणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथेही याचवेळी शंखनादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी (दि. ३०) श्री गंगा-गोदावरी पंचकोटी तीर्थ पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीच्या वतीने धार्मिक विधी होतील. सकाळी संकल्प, तीर्थपूजन, गणेशपूजन, नवग्रह व रुद्र स्थापना, स्वर्णपाद विधी आणि गोदावरी प्रार्थना होईल.
सायंकाळी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ग्रामपरिक्रम आणि शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. तर, शनिवार (दि. ३१) नाशिक येथे रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात ध्वजारोहण होणार आहे. तर सायंकाळी नाशिक येथे रामकुंड ते अहिल्याबाई होळकर पूल परिसरात सुमारे ६,५०० जनजाति बांधवांच्या सहभागातून सामूहिक गोदावरी महाआरतीचे नियोजन आहे.
यासाठी सात तालुक्यांतील ६५० गावे आणि शहरातील २८ वस्त्यांमधील नागरिकांनी नोंदणी केली आहे. याच दिवशी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे संकेतस्थळाचे लोकार्पण, सिंहस्थावरील कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, विशेष टपाल तिकीटाचे अनावरण आणि कुंभगीताचे लोकार्पण होत आहे. तसेच रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि नाशिक पुरोहित संघाची संयुक्त महाआरती होणार आहे.
२५ ऑक्टोबर, रविवार : सायंकाळी ५ ते ७ - ५०१ शंखांचा सामूहिक निनाद.
२६ ते २९ ऑक्टोबर : 'हर घर कुंभध्वज' उपक्रम आणि धार्मिक सोहळ्याची पूर्वतयारी.
३० ऑक्टोबर, शुक्रवार : सकाळी धार्मिक विधी; सायंकाळी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ग्रामपरिक्रमसह शोभायात्रा.
३१ ऑक्टोबर, शनिवार : दुपारी १२.०२ वाजता रामकुंड, कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहण; सायंकाळी गोदावरी महाआरती आणि संकेतस्थळासह विविध उपक्रमांचे लोकार्पण.