Nashik Municipal sanitation projects 
नाशिक

Nashik Municipal- मलवाहिकांसाठी जागतिक बँकेकडून हजार कोटींचे अर्थसाहाय्य घेणार

गोदा प्रदूषणमुक्तीसाठी महानगरपालिकेचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी १,७०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पीपीपी तत्त्वावर उभारणी करताना २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता, शहरात १,४५० कोटींच्या नवीन मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात अमृत २ व म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून ४५० कोटींच्या मलवाहिकांची कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित १ हजार कोटींच्या मलवाहिकांसाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य घेण्यात येणार आहे. मलवाहिकांचे सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण होणार आहे.

गोदावरी प्रदूषण ही गंभीर समस्या झालेली आहे. विविध ठिकाणी मलवाहिकांद्वारे नदीपात्रात थेट सोडण्यात येणारे सांडपाणी या प्रदूषणामागील प्रमुख कारण आहे. या प्रदूषणाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मनपाने नदी प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी नदी स्वच्छ करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून पीपीपी तत्त्वावर १,७०० कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

त्याचबरोबर २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी मलवाहिकांचे नवीन जाळे तयार करण्याची योजनाही राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांकडे वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरी वस्त्यांमधील सांडपाण्याच्या जुन्या मलवाहिका बदलून त्या ठिकाणी नवीन मलवाहिका टाकणे तसेच नव्याने विकसित झालेल्या भागात नवीन मलवाहिकांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 'अलमण्ड्स या सल्लागार कंपनीने मनपाने प्राथमिक आराखडा साद केला आहे. या प्रकल्पावर सुमारे १,४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मलवाहिकांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

मनपाने १९९५ पासून ते २०२५ दरम्यान शहरात २,५०० किलोमीटर लांबीच्या मलवाहिकांचे जाळे निर्माण केले आहे. आता त्यातील बहुतांश मलवाहिका या जुन्या, जीर्ण झाल्या आहेत. त्याऐवजी अधिक क्षमतेच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी 'अलमण्ड्स' या कंपनीमार्फत मलवाहिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पश्चिम या विभागांचे सर्वक्षण पूर्ण झाले आहे. सिडकोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. नाशिक पूर्व व सातपूर विभागाचे सर्वेक्षण महिनाभरात केले जाणार आहे.

450 कोटींची कामे सुरू

एकीकडे मलवाहिकांचे सर्वेक्षण करतानाच दुसरीकडे नवीन मलवाहिका टाकण्याची योजनाही राबविली जात आहे. अमृत २ या योजनेअंतर्गत २२७ कोटींची, तर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून २२५ कोटींची मलवाहिका योजना राबविली जात आहे. उर्वरित १ हजार कोटींच्या कामांसाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

'अलमण्ड्स' या सल्लागार कंपनीमार्फत शहरातील मलवाहिकांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात मलवाहिकांचे जाळेनिर्मितीसाठी १,४५० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यासाठी जागातिक बँकेकडून अर्थसाहाय्य मागितले जाणार आहे.

- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT