Girish Mahajan  Pudhari
नाशिक

Girish Mahajan | ‘विकसित नाशिक’साठी विकासाचा वेग वाढविणार : मंत्री गिरीश महाजन

शेतकरी, युवक आणि पर्यटनाला मिळणार नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

Nashik Progress Projects

नाशिक : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासाचा वेग वाढविण्यात येत आहे. सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, ‘वीर प्रेरणा स्थळ’, ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ यांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाचा रोडमॅप तयार झाला आहे. शेतकरी, युवक आणि महिलांना पाठबळ देतानाच पर्यटन, पर्यावरण आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून जिल्ह्याला नवी दिशा दिली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आ. सरोज अहिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यात सुमारे ५१५ मेगावॅट वीज उपलब्ध होत असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक राज्यात प्रथम आहे.

जिल्ह्यातील ३३ हजार वनहक्कधारकांची नावे सातबाऱ्यावर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अडीच लाखांहून अधिक शेतकरी ‘महाविस्तार’ ॲपचा वापर करीत असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतीतील उत्पन्नवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ या विशेष पर्यटन बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून धार्मिक व ऐतिहासिक स्थळे जोडली जाणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच युवकांना प्रेरणा मिळावी, यासाठी शहीद जवानांचे ‘वीर प्रेरणा स्थळ’ उभारण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत मंदिरा’चे नूतनीकरण सुरू असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीलाही वेग आला असून ३१ ऑक्टोबर रोजी शंखनाद होणार आहे. कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नाशिकमधील गुंतवणूक परिषदेत १३ हजार कोटी रुपयांहून अधिकचे करार झाले असून निफाड ड्रायपोर्टमधून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमातून शाळांनी सुमारे पावणेदोन लाख वृक्षांची लागवड केली आहे. ‘उन्नत नाशिक’ अभियानातून लोकसहभागाने स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसेच राष्ट्रपती व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. परा ॲथलेटिक्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये १०० मीटर धावण्यात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल दिलीप महादू गावित यांचाही गौरव करण्यात आला. वीर नारी उषा संतोष डामसे आणि नीता सदाशिव म्हसकर यांना आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT