

चांदवड : नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून जुलै २०२६ मध्ये खरेदी करण्यात आलेला कांदा साठवणूक केलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सडलेल्या अवस्थेत आढळून आला. चांदवड तालुका दक्षता समितीच्या पथकाने गणूर रोडलगत असलेल्या संबंधित गोडाऊनची अचानक पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. पाहणीदरम्यान संबंधित खरेदीदार व संस्थांच्या प्रतिनिधींनी कांदा खरेदीबाबत आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने दक्षता समितीने याबाबत स्वतंत्र नोंद केली आहे. त्यामुळे नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात नाफेड व एनसीसीएफने नियुक्त केलेल्या खासगी संस्थांमार्फत कांदा खरेदी केली जात आहे. या खरेदी प्रक्रियेत अनियमितता व गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांना कांदा खरेदीची नियमित पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हा निबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चांदवड तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास, तालुका कृषी अधिकारी निलेश मालवे व पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांच्या पथकाने गणूर रोडलगतच्या संबंधित गोडाऊनची पाहणी केली.
यावेळी संबंधित संस्थांनी पोर्टलवर किती शेतकऱ्यांची नोंदणी केली, त्यापैकी किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली, किती शेतकऱ्यांची खरेदी बाकी आहे, पात्रतेचे संदेश किती दिवसांनी दिले जातात, सातबाऱ्यावर कांदा पिकाची नोंद आहे का, कांदा खरेदीवेळी प्रत्यक्ष शेतकरी उपस्थित होता का, वजन पावती देण्यात आली का, ती पोर्टलवर दिसते का तसेच खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे किती दिवसांत जमा केले जातात, आदींबाबत माहिती मागविण्यात आली. मात्र दक्षता समितीच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रतिनिधींनी आवश्यक उत्तरे तसेच कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे समितीने याबाबत स्वतंत्र नोंद केली.
गोडाऊनमधील कांद्याची पाहणी
दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी गोडाऊनमधील कांद्याची पाहणी केली असता परिसरात दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक निबंधक, तालुका कृषी अधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांनी कांदा चाळीवर चढून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात कांदा सडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. याबाबत पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्यावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
सडलेल्या कांद्यावर चांगल्या कांद्याचा थर ?
नाफेड व एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा पूर्णतः सडलेला आहे. सडलेला कांदा दिसू नये म्हणून वरच्या बाजूस चांगला कांदा टाकण्यात आल्याचा तसेच दुर्गंधी कमी करण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
“नाफेड व एनसीसीएफद्वारे करण्यात आलेली कांदा खरेदी शासनाच्या निकषांनुसार असल्याचे दिसून आले नाही. गोडाऊनमध्ये आढळून आलेला कांदा सडलेला असल्याची नोंद तक्रारदार व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला आहे.” -
प्रेरणा शिवदास, सहाय्यक निबंधक, चांदवड.
“दक्षता समितीने तपासणीसाठी तयार केलेल्या प्रश्नसूचीत सडलेल्या कांद्याबाबत नेमका प्रश्नच नाही. त्यामुळे केवळ पाहणी करून दक्षता घेतल्याचा देखावा न करता या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष चौकशी करण्यात यावी. प्रत्यक्षात साठवणूक केलेला कांदा पूर्णतः सडलेला आहे. केंद्र सरकारचा निधी हा देशातील नागरिकांचा पैसा आहे. तो अशा प्रकारे वाया जाऊ देणे योग्य नाही. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि निधीचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठीच झाला पाहिजे.”
- गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, प्रहार.