Board Exam 
नाशिक

Washim SSC HSC Exam 2026 | वाशिम जिल्ह्यात परीक्षेचा रणसंग्राम! 42 हजार विद्यार्थी देणार दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा

Washim SSC HSC Exam 2026 | प्रशासन सज्ज; दहावीचे 20 हजार तर बारावीचे 22 हजार परीक्षार्थी

पुढारी वृत्तसेवा

वाशिम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मंडळाच्या निर्देशानुसार बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे.

यंदा वाशिम जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५६, तर बारावीच्या परीक्षेसाठी २२ हजार ३६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, एकूण ४२ हजार ४२५ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेदरम्यान सतत देखरेख ठेवली जाणार असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व्यापक तयारी केली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ८८ परीक्षा केंद्रांवरील ८३५ वर्गखोल्यांमध्ये, तर बारावीच्या परीक्षेसाठी ७४ परीक्षा केंद्रांवरील ८३० वर्गखोल्यांमध्ये मंडळाच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरू आहे.

उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष

दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण मंडळाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत उपद्रवी परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

वाशिम जिल्ह्यात दहावीची १९ व बारावीची २८ अशी एकूण ४७ उपद्रवी परीक्षा केंद्रे असून, या ठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी अतिरिक्त दक्षता व कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर विद्युत जोडणी, पंखे, दिवे तसेच इतर आवश्यक भौतिक सुविधांची पाहणी करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी जनरेटर किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, त्यासोबतच आवश्यक सोयीसुविधांचीही पाहणी करण्यात येत आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आकाश आहाळे यांनी दिली.

एकूणच यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT