नाशिक : जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांचे निलंबन झाल्याने या रिक्त झालेल्या जागेवर बसण्यासाठी विशाखा समितीत काम करणाऱ्या सदस्य अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. त्यासाठी संबंधित सदस्य अधिकाऱ्यांनी काही लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत फिल्डींग लावल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे.
शासकीय गट अ व ब गटातील अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रिया सुरू आहे. यात ग्रामविकास अतंर्गत असलेल्या महत्वाच्या समजल्या जाणा-या पुणे, नाशिक या जिल्हा परिषदेत येण्यासाठी स्पर्धा लागली आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. अर्जुन गुंडे यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असल्याने या जागेसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, डाॅ. गुंडे फेब्रुवारी 2026 मध्ये सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यास प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
इतर बहुतांश विभागांचे प्रमुख यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा नसल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता कमी होती. मात्र, गत महिन्यात महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे परदेशी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली. त्यामुळे या रिक्त जागेवर बसण्यासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे. या रिक्त जागेसाठी जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या स्वीय सहायक यांचे नावे आघाडीवर आहे.
यातच जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या अन् महिनाभरापासून चर्चेत आलेल्या विशाखा समितीतील सदस्य अधिकाऱ्यांनी या जागेवर डोळा ठेवून, लाॅबिंग करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांकडून पत्र घेतले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मंत्रालयात एका मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकांमार्फत वशीला लावल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फतही प्रयत्न सुरू केले आहेत. समितीमधील सदस्य अधिकाऱ्यांनीच या जागेसाठी लाॅबिग सुरू केल्याने परेदशी यांना यासाठीच हटविले गेल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.