

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट, गण प्रारूप आराखडयावर अखेरच्या दिवशी सोमवारी (दि. 21) ग्रामीण भागातून हरकतींचा पाऊस पडला.
सोमवारी (दि.21) 15 तालुक्यातून तब्बल 54 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत गट, गण रचनेवर एकूण 60 हरकती प्राप्त झाल्या आहे. यात सर्वाधिक हरकती निफाड व नाशिक तालुक्यातून आहे.
साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या जिल्हा परिषदेच्या गट-गण रचनेचे प्रारूप सोमवारी (दि.१४) प्रसिध्द करण्यात आले. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढल्याने त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले आहेत.
तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याठिकाणी याद्या प्रसिध्द झाल्या. याद्या प्रसिध्द झाल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. यात 14 व 15 जुलै रोजी एकही हरकत प्राप्त झाली नव्हती. त्यानंतर, 16, 17 व 18 जुलै रोजी जिल्ह्यातून एकूण ६ हरकती प्राप्त झाल्या. यात, देवळा दोन, नांदगाव दोन तर चांदवड व निफाड प्रत्येकी एक हरकत नोंदवण्यात आली.
तहसिल कार्यालयाकडे : 43
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे : 17
१६ जुलै - 3
१७ जुलै - 1
१८ जुलै - 2
21 जुलै - 54
मालेगाव - 12
देवळा - 3
कळवण - 1
सुरगाणा - 1
पेठ - 1
चांदवड - 4
नांदगाव- 2
येवला - 1
निफाड - 18
नाशिक - 14
त्र्यंबकेश्वर - 1
सिन्नर - 2
सोमवारी (दि. 21) हरकती नोंदविण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे हरकती नोंदविण्यासाठी इच्छूकांनी गर्दी केली होती. यात एका दिवसात सुमारे 54 हरकती प्राप्त झाल्या आहेत. बागलाण, दिंजोरी, इगतपुरी या तालुक्यातून एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त होणा-या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह प्रस्ताव २८ जुलैपर्यंत विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन हरकती निकाली काढल्यानंतर गट-गण रचनेचे अंतिम प्रारूप १८ ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.